जाणून घ्या, अशी राहिलीय भूषण गगराणी यांची प्रशासकीय कारकीर्द!

20 Mar 2024 19:05:57
Bhushan Gagrani Administrative Journey

 
मुंबई :    इक्बालसिंह चहल यांना मुंबई पालिका आयुक्त पदावरून हटवल्यानंतर त्यांच्या जागी मराठमोळे अधिकारी भूषण गगराणी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. भूषण गगराणी हे भारतीय प्रशासन सेवेतील सन १९९० च्या बॅचचे अधिकारी आहेत. संपूर्ण भारतातून तिसऱ्या क्रमांकाने आणि मराठी भाषा घेऊन उत्तीर्ण होणारे ते देशातील पहिलेच सनदी अधिकारी (आयएएस) आहेत. कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठातून वाणिज्य शाखेची पदव्युत्तर पदवी तसेच इतिहास या विषयातही कला शाखेची पदव्युत्तर पदवी त्यांनी संपादित केली आहे.

यासह डॉ. गगराणी यांनी नागपूर विद्यापीठातून विधी शाखेची पदवीही संपादन केली आहे. तर लंडन येथील बर्मिंगहॅम विद्यापीठातून प्रशासन या विषयातून त्यांनी व्यवस्थापन शाखेची पदव्युत्तर पदवी संपादन केली आहे. यासह मुंबई विद्यापीठातून व्यवस्थापन या विषयात त्यांनी विद्यावाचस्पती (पीएच. डी.) पदवी मिळविली आहे. प्रशासकीय सेवेत प्रवेश केल्यानंतर डॉ. गगराणी यांनी सुरुवातीची दोन वर्षे भूमी महसूल व्यवस्थापन आणि जिल्हा प्रशासन, विकास प्रशासन या संदर्भातील कामकाज पाहिले.


हे वाचलंत का? -   भूषण गगराणी नवे बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त!



छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद) येथे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पुणे येथे युवक कल्याण आणि क्रीडा विभागाचे संचालक, सिंधुदुर्ग येथे जिल्हाधिकारी म्हणून कामकाम पाहिले. त्यानंतर मुख्यमंत्री सचिवालयात उप सचिव, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे सचिव, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाचे सचिव, सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी, शहर आणि औद्योगिक विकास महामंडळाचे (सिडको) व्यवस्थापकीय संचालक अशा निरनिराळ्या पदांची धुरा सांभाळताना त्यांनी आपल्या कार्याचा विशेष ठसा उमटविला.
 
त्यानंतर मुख्यमंत्री कार्यालयात प्रधान सचिव आणि नगर विकास विभागात प्रधान सचिव म्हणून देखील त्यांची नियुक्ती करण्यात आली. बृहन्मुंबई महानगरपालिकेत नियुक्त होण्यापूर्वी डॉ. भूषण गगराणी मुख्यमंत्री कार्यालयात अतिरिक्त मुख्य सचिव या पदावर कार्यरत होते. तसेच त्यांच्याकडे नगरविकास, जलसंपदा आणि मराठी भाषा या विभागांची देखील जबाबदारी होती.


Powered By Sangraha 9.0