छत्रपतींवरील चित्रपटांची सह्याद्री वाहिनीवर मालिका, 'शेर शिवराज'चे होणार प्रसारण

02 Mar 2024 12:21:20
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला ३५० वर्ष पुर्ण झाली असून याचे औचित्य साधत महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विभागाकडून छत्रपतींना मानवंदना दिली जात आहे.
 

sher shivraj 
 
मुंबई : राजमाता जिजाऊंचे स्वराज्याचे स्वप्न पुर्ण करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज (Chattrapati Shivaji Maharaj) यांच्या राज्याभिषेक सोहळ्याला ३५० वर्ष पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने सह्याद्री वाहिनीवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित प्रेरणादायक ऐतिहासिक आणि चित्रपटांची मालिका सुरु आहे. या चित्रपटांच्या मालिकेत दिग्दर्शिक दिग्पाल लांजेकर (Digpal Lanjekar) यांच्या दोन चित्रपटांना मान मिळाला आहे. काही दिवसांपुर्वी सह्याद्री वाहिनीवर ‘फत्तेशिकस्त’ (Fatteshikast) हा ऐतिहासिकपट दाखवण्यात आला होता. आता दिग्पाल यांचाच `शेर शिवराज' (Sher Shivraj Movie) हा चित्रपट आज २ मार्च २०२४ रोजी दुपारी दीड वाजता प्रसारित होणार आहे.
 
दरम्यान, आजवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित अनेक कलाकृती भेटीस आल्या आहेत. या प्रत्येक कलाकृतीतून प्रेक्षकांना स्फुर्ती मिळतेच. त्यामुळे ‘शेर शिवराज’ हा चित्रपट राज्यातील प्रेक्षकांनी आवर्जून पाहावा असे आवाहन महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी सांस्कृतिक विकास महामंडळाचे व्यवस्थापक डॉ. अविनाश ढाकणे यांनी केले आहे. दरम्यान, या उपक्रमाचे सुत्र महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी सांस्कृतिक विकास महामंडळाने हाती घेतले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्षानिमित्ताने राज्यात विविध ठिकाणी अनेक कार्यक्रम सुरु आहेत. या कार्यक्रमांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आणि प्रेरणा नव्या पिढीपर्यंत पोहोचावी हा ध्यास आहे.
 
आपण हे वाचलंत का? -  
 
“...आणि त्यादिवशी 'शिवरायांचा छावा' चित्रपटाचा सेट वाहून गेला” , दिग्पाल यांनी सांगिताला ‘तो’ किस्सा
 
सह्याद्री वाहिनीवर ऐतिहासिक चित्रपटांची मालिका
 
शिवराज अष्टकच्या माध्यमातून पुढच्या पिढीपर्यंत शिवरायांचा इतिहास पोहोचावा हा ध्यास मनात घेऊन दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी छत्रपतींच्या जीवनावर आधारित आठ सिनेमांची घोषणा केली होती. त्यातील ‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’, ‘शेर शिवराज’, ‘पावनखिंड’, ‘सुभेदार’ हे चित्रपट भेटीला आले. याशिवाय छत्रपती संभाजी महाराजांची महानता आणि शौर्य देखील लोकांना कळावे या अट्टाहासामुळे त्यांनी शिवरायांचा छावा हा चित्रपट भेटीला आणला असून आणखी दोन भागांत शंभुराजांचा इतिहास ते दाखवणार आहेत.
 
दरम्यान, आत्तापर्यंत प्रदर्शित झालेले त्यांचे सर्व चित्रपट सह्याद्री वाहिनीवर प्रसारित केले जाणार आहेत. शिवरायांची प्रेरणा रसिकप्रेक्षकांना मिळावी, यासाठी राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुंनगंटीवार यांच्या संकल्पनेतून आणि सांस्कृतिक विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित निवडक प्रेरणादायक चित्रपट दाखविण्याचा स्तुत्य उपक्रम महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी सांस्कृतिक विकास महामंडळामार्फत राबविण्यात येत आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0