नवी दिल्ली (पार्थ कपोले) : तृणमूल काँग्रेस पक्षाचा नेता शाहजहान शेख याने आमचे शारिरिक, सामाजिक आणि आर्थिक शोषण केले आहे. त्याला कठोर शासन न झाल्यास आमचे प्राण धोक्यात आहेत. त्यामुळे कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी आर्त हाक संदेशखालीतील पीडितांनी शनिवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना दिली आहे.
पश्चिम बंगालमधील संदेशखाली गावात सत्ताधारी तृणमूल काँग्रेसचे नेता शाहजहान शेख आणि त्याच्या टोळीने केलेल्या लैंगिक शोषणाच्या प्रकारांनी संपूर्ण देशल हादरला आहे. सध्या शाहजहान शेख तपास यंत्रणांच्या ताब्यात असला तरीदेखील गावकऱ्यांवर त्याची दहशत कायम आहे. या पार्श्वभूमीवर संदेशखाली गावातील पीडितांनी शनिवारी राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेऊन त्यांच्यापुढे आपली परिस्थिती मांडली. त्यानंतर पत्रकारपरिषदेत पीडित महिलांनी त्याची माहिती दिली.
गेल्या अनेक वर्षांपासून तृणमूल काँग्रेस नेता शाहजहान शेख आणि त्याचे सहकारी गावातील दलित आणि वनवासी महिलांचे सामाजिक, आर्थिक आणि शारीरिक शोषण करत आहेत. या प्रकारास विकोध केल्यास संबंधित महिलांच्या कुटुंबियांना मारहाण करून त्यांनी जीवे मारण्याची धमकी देण्यात येते. हा प्रकार उघडकीस आल्यानंत राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग, अनुसूचित जाती आयोग आणि महिला आयोगाच्या पथकानेही संदेशखाली येथे भेट देऊन त्यांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर सध्या शाहजहान शेख हा सीबीआयच्या ताब्यात असला तरीदेखील सिराज शेख आणि आलमगीर हे त्याचे दोन भाऊ न्यायपालिकेमध्ये हा विषय थंड बस्त्यात गेल्यानंतर आम्ही बघून घेऊ, अशा धमक्या देत असल्याचे पीडितांनी सांगितले.
शाहजहान शेखचे भाऊ पीडितांवर आपले जबाब बदलण्याचा दबाब टाकत असल्याचेही पीडितांनी सांगितले. त्या पुढे म्हणाल्या, पोलिस आणि प्रशासदेखील शाहजहानच्या इशाऱ्यावर काम करत आहेत. त्यामुळे शाहजहानच्या दोन्ही भावांनाही सीबीआयने ताब्यात घेणे गरजेचे आहे. राज्य सरकार या प्रकरणात बघ्याचीच भूमिका घेत असून शाहजहानवर अनुसूचित जाती – जमाती अत्याचार प्रतिबंधक आणि नागरी हक्क संरक्षण कायद्याची कलमे लावण्यात आलेली नाहीत, असेही त्यांनी यावेळी नमूद केले आहे.