दिल्लीत बांगलादेशी घुसखोराने टाकला ३ कोटीचा दरोडा!
दिल्ली पोलिसांसोबतच्या चकमकीत दरोडेखोर मेहराज अटक
15-Mar-2024
Total Views |
नवी दिल्ली : बांगलादेशी दरोडेखोर मेहराज याला दिल्ली पोलिसांनी एका चकमकीत अटक केली आहे. अनेक गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेला हा दरोडेखोर पोलिसांना हवा होता. गेल्या वर्षी त्याने दिल्लीत मोठा दरोडा टाकला होता. या बांगलादेशी दरोडेखोरासोबत आणखी एका गुन्हेगारालाही अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी, दि. १५ मार्च २०२४ द्वारकाच्या धुलसिरस भागात दरोडेखोर आणि दिल्ली पोलिसांमध्ये चकमक झाली. या चोरट्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी येथे सापळा रचला होता. पोलिसांना पाहताच त्यांनी गोळीबार सुरू केला. याला प्रत्युत्तर म्हणून पोलिसांनीही गोळीबार केला.
पोलिसांनी केलेल्या गोळीबारात बांगलादेशी गुन्हेगार मेहराज उर्फ मेराज याच्या पायाला गोळी लागली. त्याच्यासोबत आणखी एक गुन्हेगार शाहिदलाही पकडण्यात आले. मेहराजने केलेल्या गोळीबारात पोलिस निरीक्षक अक्षय यांना एक गोळी लागली. मात्र, पोलिस निरीक्षक अक्षय यांनी बुलेटप्रूफ जॅकेट घातल्याने त्यांना कोणतीही इजा झाली नाही.
पोलिसांनी सांगितले की, मेहराजला पोलिसांच्या वाहनातून रुग्णालयात पाठवण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. मेहराज हा बांगलादेशचा रहिवासी असून त्याच्यावर पाच गुन्हे दाखल आहेत. त्याने चोरी, अवैध शस्त्र बाळगणे असे अनेक गुन्हे केले आहेत. गेल्या वर्षी त्याने दिल्लीतील अशोक विहारमध्ये एका व्यापारी कुटुंबाला लक्ष्य करून दरोडा टाकला होता.
बंदुकीच्या धाकावर त्याने एका कुटुंबाकडून ३ कोटी रुपये लुटले होते. यापूर्वी त्याने कुटुंबीयांना मारहाण करून एका खोलीत कोंडून ठेवले होते. त्याने या कुटुंबाकडून १.३८ कोटी रुपये रोख आणि १.५० कोटी रुपयांचे दागिने लुटून फरार झाला होता. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध अशोक नगर पोलिस ठाण्यात अनेक कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी त्याच्यावर दोन लाखांचे बक्षीस जाहीर केले होते.