एनडीए ४००+ अधिक तर काँग्रेसचा सुपडा साफ! - News 18 Mega Opinion Poll

15 Mar 2024 15:43:55
 modi
 
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाजपप्रणित एनडीए आघाडीला “अबकी बार, 400 पार” पोहोचवण्याचे स्वप्न साकार होताना दिसत आहे. देशातील विविध वृत्तवाहिन्यांनी केलेल्या वेगवेगळ्या ओपिनियन पोल आणि सर्वेक्षणानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भाजप बहुमतासह तिसऱ्यांदा सत्तेत येणार असल्याचे भाकित केले आहे.
 
लोकसभा निवडणुकच्या आधी न्यूज १८ मेगा ओपिनियन पोलमध्ये एनडीए आघाडी सलग तिसऱ्यांदा ऐतिहासिक विजय मिळवेल, असे भाकित केले आहे. एवढेच नाही, तर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात एनडीए ४०० जागांचा आकडा पार करेल, असा अंदाज देखील वर्तवण्यात आला आहे.
 
 हे वाचलंत का? - "आमच्या नावावर लोककल्याणकारी योजना आहेत तर विरोधकांच्या नावावर लाखो कोटीचे घोटाळे"
 
भारतातील सर्वात मोठ्या ओपिनियन पोलचा अंदाज आहे की, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजप विक्रमी ३५० जागा मिळवेल. त्या सोबतचं ५४३ लोकसभा खासदारांपैकी भाजपप्रणित एनडीएला ४११ जागा मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. याचाच अर्थ एनडीएतील घटक पक्षांना ६१ जागांवर विजय मिळेल, असा अंदाज ओपिनियन पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे.
 
ओपिनियन पोलमधील सर्व्हेनुसार, एनडीएला उत्तर प्रदेशात ७७ जागा, मध्य प्रदेशात २८ जागा, छत्तीसगडमध्ये १० जागा, बिहारमध्ये ३८ जागा आणि झारखंडमध्ये १२ जागा, कर्नाटकातील २५ जागांसह भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए या राज्यामध्ये एकहाती वर्चस्व राखेल. या शिवाय, आंध्र प्रदेशसह इतर प्रदेशांमध्ये या संख्येत लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे, जेथे संख्या १८ जागांवर जाईल, पश्चिम बंगालमध्ये २५ जागा, ओडिशातील १३ जागा आणि तेलंगणातील ८ जागांवर भाजपप्रणित एनडीए आघाडीचा विजय होईल.
 
ओपिनियन पोलमध्ये एनडीए आघाडीला मोठा विजय दाखवण्यात आला असताना इंडी आघाडीला मिळणाऱ्या जागांविषयी देखील अंदाज बांधण्यात आला आहे. ओपिनियन पोलच्या सर्व्हेक्षणानुसार, इंडी आघाडीतील काँग्रेस, समाजवादी पक्ष, राष्ट्रीय जनता दल आणि द्रविड मुन्नेत्र कळघम (डीएमके) यासह इतर विरोधी पक्षांच्या आघाडीला लोकसभेत १०५ जागा मिळतील. तर, देशातील दुसरा सर्वात मोठा पक्ष असलेल्या काँग्रेसला ४९ जागांवर समाधान मानावे लागेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0