"आमच्या नावावर लोककल्याणकारी योजना आहेत तर विरोधकांच्या नावावर लाखो कोटीचे घोटाळे"

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा इंडी आघाडीवर घणाघात

    15-Mar-2024
Total Views |
 PM Modi
 
चेन्नई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी देशभरात दौरे करत आहेत. शुक्रवार, दि. १५ मार्च २०२४ पंतप्रधान नरेंद्र मोदी तामिळनाडूच्या दौऱ्यावर गेले आहेत. आपल्या तामिळनाडू दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कन्याकुमारी येथे एका जाहीर सभेत विरोधकांवर चांगलाच निशाणा साधला.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, "कन्याकुमारीपासून जी लाट उठली आहे ती आज खूप दूर जाणार आहे. मी १९९१ मध्ये कन्याकुमारी ते काश्मीर एकता यात्रा घेऊन गेलो होतो, यावेळी मी काश्मीरमधून कन्याकुमारीला आलो आहे. जम्मू -देश तोडण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांना काश्मीरच्या जनतेने नाकारले आहे.आता तामिळनाडूची जनताही तेच करणार आहे. तमिळनाडूच्या भूमीवर मोठा बदल होताना मला दिसत आहे. तामिळनाडूमधील भारतीय जनता पक्षाच्या कामगिरीने डीएमके आणि काँग्रेसच्या युतीचे घमंड संपुष्टात येणार आहे."
 
 
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणात विरोधकांवर चांगलाच निशाणा साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, "आम्ही ऑप्टिकल फायबर आणि ५जी दिले, डिजिटल इंडिया योजना आमच्या नावावर आहे. दुसरीकडे, इंडी आघाडीच्या नावावर लाखो कोटींचा २जी घोटाळा आहे आणि त्यात द्रमुक सर्वात मोठा भागधारक होता. आमच्या नावावर उडान योजना आहे, इंडी आघाडीच्या नावावर हेलिकॉप्टर घोटाळा आहे. आमच्या खेलो इंडिया आणि टॉप्स योजनांमुळे देशाला क्रीडा क्षेत्रात उच्च उंची गाठण्यात मदत झाली आहे, परंतु त्यांचे नाव कॉमनवेल्थ घोटाळ्याने कलंकित झाले आहे."
 
इंडी आघाडी तामिळनाडूचा विकास करु शकत नाही, असे वक्तव्य सुद्धा पंतप्रधानांनी केले. ते म्हणाले की, "इंडी आघाडी कधीच तामिळनाडूचा विकास करू शकत नाही. या लोकांचा इतिहास घोटाळ्यांचा आहे. जनतेला लुटण्यासाठी सत्तेवर येणे हाच त्यांच्या राजकारणाचा आधार आहे. एकीकडे भाजपच्या कल्याणकारी योजना आहेत, तर दुसरीकडे. करोडो रुपयांचे घोटाळे आहेत."