चंदीगढ : लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सगळेच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. त्यातच आता इंडी आघाडीतील दोन मित्रपक्षांमध्ये फोडाफोडीचे राजकारण सुरू झाले आहे. पंजाबमध्ये आम आदमी पक्षाने काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. पंजाबमध्ये काँग्रेस पक्षाचे आमदार डॉ. राजकुमार चब्बेवाल यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि आमदार पदाचा राजीनामा दिला आहे.
राजकुमार चब्बेवाल यांनीच ही माहिती आपल्या ट्विटर हँडलवरून दिली आहे. काँग्रेसमधून राजीनामा देताच, चब्बेवाल यांनी आम आदमी पक्षात प्रवेश केला आहे. राजकुमार चब्बेवाल हे होशियारपूर जिल्ह्यातील चब्बेवाल विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या चिन्हावर निवडून आलेले आमदार आहेत. त्यांनी आपला राजीनामा काँग्रेस प्रदेशाध्यक्षांकडे पाठवला आहे. आजपर्यंत त्यांनी पक्ष सोडण्याचे कोणतेही कारण सांगितलेले नाही.
लोकसभा निवडणुकीपूर्वी आम आदमी पक्ष आणि काँग्रेसची दिल्ली आणि गुजरातमध्ये युती झाली आहे. पण पंजाबमध्ये दोन्ही पक्षांनी स्वातंत्र निवडणुक लढवण्याची घोषणा केली आहे. शुक्रवारी, दि. १४ मार्च २०२४ आम आदमी पक्षाने पंजाबमधील ८ लोकसभा जागांवरील आपले उमेदवार घोषित केले आहेत.
पंजाबमध्ये लोकसभेच्या एकूण १३ जागा आहेत. पुढील काही दिवसांमध्ये आम आदमी पक्ष उरलेल्या पाच जांगावर सुद्धा आपल्या उमेदवारांची घोषणा करण्याची शक्यता आहे. त्यातच आता आम आदमी पक्षाने काँग्रेस पक्षातील आमदारांना आपल्या पक्षात प्रवेश दिल्यामुळे दोन्ही पक्षामध्ये तणाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.