मुंबई : पुण्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते वसंत मोरे यांनी नुकताच राजीनामा दिला आहे. त्यामुळे मनसेला पुण्यात मोठे खिंडार पडले आहे. दरम्यान, माजी मनसे नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी वसंत मोरेंना राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात येण्याची ऑफर दिली आहे.
रुपाली पाटील म्हणाल्या की, "लोकहितासाठी हातोडा घेऊन जाणारा नेता काम करत असताना त्याची होणारी कुचंबना, त्याला थांबवण्यासाठी केलेले अडथळे या गोष्टी अनेक वर्षे वसंत मोरे यांनी सहन केल्या आहेत. कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता नेत्यांच्या स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी कण्यासहित मोडून टाकला जातो. भाऊ तुझी लढाई चालू ठेव. तुझ्यासाठी बहिनीचे दरवाजे कायम उघडे आहेत हे लक्षात ठेव. वसंत मोरेंनी राजीनामा देऊन योग्य निर्णय घेतला आहे. वसंत भाऊ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आपले स्वागतच असेल," असे त्या म्हणाल्या आहेत.
हे वाचलंत का? - वसंत मोरे मनसेतून बाहेर 'या' पक्षातर्फे लोकसभा लढविण्याची शक्यता!
गेल्या अनेक दिवसांपासून वसंत मोरे नाराज असून ते पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छूक असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, वसंत मोरेंच्या राजीनाम्यामुळे मनसेला मोठा धक्का बसला आहे. मोरेंनी सकाळी फेसबुकवर एक भावनिक पोस्टदेखील शेअर केली होती.