अखेर संदेशखालीचा कसाई पोलिसांच्या ताब्यात!

29 Feb 2024 11:18:00
Sandeshkhali 
कोलकाता : पश्चिम बंगाल पोलिसांनी संदेशखाली प्रकरणातील मुख्य आरोपी आणि तृणमूल काँग्रेसचा नेता शेख शाहजहानला अखेर अटक केली आहे. दि. २९ फेब्रुवारी रोजी सकाळी पोलिसांनी त्याला अटक केली. गेल्या ५५ दिवसांपासून तो फरार होता. दरम्यान, त्याच्या अनेक जवळच्या नातेवाईकांना अटक करण्यात आली होती, मात्र शाहजहानचा शोध लागू शकला नाही. गुरुवारी बंगाल पोलिसांनी त्याला मिनाखान परिसरातून पकडले.
 
मिनाखान एसडीपीओ अमिनुल इस्लाम खान यांनी सांगितले की, पश्चिम बंगाल पोलिसांनी शाहजहान शेखला उत्तर २४ परगणा येथील मिनाखान भागातून अटक केली आहे. अटकेनंतर त्याला बसीरहाट उपविभागीय न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे.
 
आपण हे वाचलंत का? -  'या' दिवशी लागू होणार CAA?
 
संदेशखाली येथील तृणमूल काँग्रेसचे नेते शेख शाहजहान यांच्याविरोधात पोलिसांकडे ७० हून अधिक तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या, त्यानंतर पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी या प्रकरणी एफआयआर दाखल केला होता. त्याचवेळी कोलकाता उच्च न्यायालयाने स्पष्टपणे सांगितले की, शेख शाहजहानच्या अटकेवर कोणतीही बंदी घालण्यात येत नाही. त्याला अटक करणे गरजेचे आहे.
 
संदेशखळी येथील महिलांवरील लैंगिक अत्याचार आणि जमीन बळकावल्याचा मुख्य आरोपी तृणमूल काँग्रेसचा नेता शाहजहान शेख याला सीबीआय, अंमलबजावणी संचालनालय (ईडी) किंवा पश्चिम बंगाल पोलिसांनी अटक केली जाऊ शकते, असे निर्देश न्यायालयाने बुधवारी दिले. उच्च न्यायालयाच्या फटकारल्यानंतर बंगालच्या टीएमसी पक्षाने एका आठवड्यात शेख शाहजहानला पकडू असे सांगितले होते.
 
उल्लेखनीय आहे की, गेल्या महिन्यात रेशन घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालय शेख शाहजहानच्या घरावर छापा टाकण्यासाठी आले होते. मात्र, त्याच्या समर्थकांनी ईडीच्या पथकावर हल्ला केला. ईडीच्या पथकावर करण्यात आलेल्या हल्लानंतर शेख शाहजहान फरार झाला होता.
 
 
Powered By Sangraha 9.0