(Cheque from Jail)
लखनौ : अयोध्येत २२ जानेवारी रोजी श्रीरामलला प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न झाला. केवळ भारतातच नव्हे तर भारताबाहेरही राममय वातावरण झाले होते. मंदिरासाठी आपल्या जमापूंजीतून देणगी देणाऱ्या लोकांच्या संख्येत लक्षणीय वाढ होताना सध्या दिसत आहे. त्यापैकी श्रीरामललाच्या चरणी असा एक चेक आला आहे जो इतरांपेक्षा वेगळा आहे. १०७५ रुपयांचा हा चेक फतेहपूर तुरुंगातील एका कैद्याने पाठवला आहे.
आपण हे वाचलंत का? : अयोध्या आणि श्रीनगरमध्ये महाराष्ट्र भवन उभारणार!
फतेहपूर तुरुंगात बंदिस्त असलेल्या जियाउल हसन या बंदिस्त असलेल्या कैद्याने झाडू मारून जमा झालेली आपली दीड महिन्याची कमाई १०७५ रुपये श्रीरामललाचरणी समर्पित केली आहे. जियाउल हसन हा फतेहपूरच्या रामजानकी पुरमचा रहिवासी. जियाउलने कारागृह अधीक्षकांकडे विनंती केली असता त्यांनी १०७५ रुपयांचा धनादेश तयार करून अयोध्येतील कारसेवकपुरमला पाठवला होता. हा धनादेश १७ जानेवारी रोजी प्राणप्रतिष्ठापूर्वी देण्यात आल्याचे दिसत आहे. कैद्याचा धनादेश श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्राच्या खात्यात जमा करण्यात आल्याचे कारसेवकपुरमचे कोषागार सहाय्यक वीरेंद्र कुमार यांनी सांगितले.