आपुलिया हिता जो असे जागता। धन्य माता-पिता तयाचिया॥
संत तुकाराम महाराजांच्या या अभंगाची इंग्लंडला आज खरी नितांत गरज आहे. कारण, त्या देशावर प्रसंगच असा बाका ओढवला आहे. इंग्लंडमध्ये 2023 मध्ये ठेवलेल्या बाळांच्या नावामध्ये अग्रक्रमाचा मान ‘मोहम्मद’ या नावाला मिळाला. घरामध्ये बाळाचा जन्म झाला की त्याचे नाव काय ठेवायचे, याची एक लगबग सुरू होते. हे नाव ठेवण्यामागे धर्म, संस्कृती, आराध्य देवता, आदर्श राष्ट्रपुरुष असा कोणताही एक विचार असतो. साधारणपणे प्रत्येक प्रदेशातील ठराविक नावे ही ओळखीची झाली आहेत. बाळाचे नाव हे फक्त एका व्यक्तीपुरते मर्यादित नसून, तो संस्कृतीचा आरसादेखील असतो. इंग्लंडमध्ये आता बदल दिसू लागला आहे. ख्रिश्चनबहुल असलेल्या इंग्लंड आणि वेल्स या देशात लहान मुलांच्या नावांच्या यादीत ‘मोहम्मद’ या नावाने अव्वल स्थान मिळविले आहे.
प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या नावावरून ‘मोहम्मद’ किंवा ‘मुहम्मद’ अशी नावे ठेवण्याचा कल इंग्लंड आणि वेल्स या दोन्ही देशांमध्ये वाढत आहे. ‘ऑफिस फॉर नॅशनल स्टॅटिस्टिक्स’ने केलेल्या सर्वेक्षणानुसार, ‘मोहम्मद’ किंवा ‘मुहम्मद’ ही नावे पालकांच्या पसंतीस उतरत आहेत. 2023 मध्ये जन्मलेल्या एकूण बाळांपैकी 4 हजार, 661 बाळांचे नामकरण ‘मोहम्मद’ असे करण्यात आले होते. त्यामुळे सर्वात जास्त पसंतीस उतरलेल्या नावांच्या यादीत अग्रक्रमाचा मान या नावास मिळाला.
हा बदल फक्त वरवरचा नसून, या बदलामागील गांभीर्यदेखील समजून घेतले पाहिजे. आजवर येशू ख्रिस्ताच्या ख्रिश्चन धर्माची संस्कृती जोपासलेल्या इंग्लंडमध्ये ‘मोहम्मद’ हे नाव प्रचलित व्हावे, हा बदल लोकसंख्येतील वाढत्या मुस्लीम संख्येकडे स्पष्ट अंगुलीनिर्देश करतो. मुस्लीम लोकसंख्या वाढण्याचे दोन मार्ग आहेत. एक म्हणजे धर्मांतरण आणि दुसरा म्हणजे स्थलांतरण. मुळातच पालकांच्या धर्माचेच आचरण पुढील पिढीकडून होत असते. त्यामुळे धर्मांतरण हा मुद्दा इथे गैरलागूच. म्हणजेच युरोपातील स्थलांतरण हा मुद्दा या सगळ्या प्रकरणाच्या मुळाशी आहे. इंग्लंडमध्ये सध्या मुस्लिमांचे स्थलांतर मोठ्या प्रमाणावर होत आहे. सुरुवातीला उदारमनाच्या प्रजेने या सगळ्या मुस्लीम नागरिकांचे पायघड्या घालून स्वागत केले, आता त्यांना त्यांचीच संस्कृती नाहीशी होण्याची भीती सतावू लागली आहे. ‘मोहम्मद’ नावाच्या मुलांची संख्या वाढणे हे इंग्लंडमधील सांस्कृतिक स्थित्यंतराचे दर्शन घडवण्यासाठी पुरेसे आहे.
‘मुस्लीम काऊन्सिल ऑफ ब्रिटन’च्या सर्वेक्षणानुसार, इंग्लंड आणि वेल्सची लोकसंख्या अंदाजे सहा कोटी. यामध्ये 38 लाख, 70 हजार लोकसंख्या मुस्लीम धर्मीयांचीच. 2011 आणि 2021 दरम्यान इंग्लंड आणि वेल्सची लोकसंख्या 35 लाखांनी वाढली. या वाढीपैकी 11 लाख, 60 हजार एवढे मुस्लीम धर्मीय आहेत.आजही मुस्लिमांच्या लांगूलचालनाचे भूत युरोपीय देशांच्या डोक्यातून पुरते उतरलेले नाही. इंग्लंडमधील नागरिकांचे मुस्लीमप्रेम इतके टोकाला गेले आहे की, त्यामुळेच चक्क एका प्रांताचा महापौर हा मुस्लीम आहे, याचे काहीही वैषम्य त्यांना वाटत नाही. आंधळेपणाने धर्मनिरपेक्षपणाच्या तत्वाचा अवलंब केल्याने फक्त इंग्लंडच नव्हे, तर संपूर्ण युरोपात आज हीच स्थिती सहज दिसून येईल. इथे विरोध कोणाच्याही नावाला नसून, त्यामुळे नैसर्गिकपणे समोर आलेले वास्तव आज ना उद्या युरोपला स्वीकारावेच लागणार आहे.
ख्रिस्तीबहुल देशामध्ये इस्लाम धर्मातील एका नावाची लोकसंख्या वाढणे, ही केवळ एका नावापुरतीच बाब नाही, तर ती इंग्लंडच्या मूलभूत सांस्कृतिक ओळखीवर होणारा आघात आहे. इंग्लंडसारख्या देशासाठी हा एक मोठा इशारा आहे, जो त्याच्या परंपरा आणि ओळख गमावण्याच्या उंबरठ्यावर उभा आहे. वाढत्या मुस्लीम प्रभावामुळे इंग्लंडच्या राजकीय वातावरणातही मोठे बदल दिसतील. भविष्यकाळात हा विषय एक नव्या प्रकारच्या सत्तासंघर्षाचा कारक ठरण्याची दाट शक्यता आहे. याकडे सजगतेने पाहण्याची गरज आहे. आजच या बदलांचा वेध न घेतल्यास, भविष्यात इंग्लंड हा केवळ भौगोलिक प्रदेश राहील, त्याची सांस्कृतिक आणि ऐतिहासिक ओळख पूर्णपणे बदललेली असेल. त्यामुळे नाताळचे गीत आणि चर्चची घंटा कायमस्वरुपी बंद होऊ द्यायची नसेल, तर इंग्लंडला जागे व्हावे लागेल.