मुख्यमंत्रीपदासाठी फडणवीसांच्या नावाची शिफारस करण्याची संधी मिळाली याचा आनंद : एकनाथ शिंदे

04 Dec 2024 17:20:42
 
Shinde
 
मुंबई : मुख्यमंत्रीपदासाठी फडणवीसांच्या नावाची शिफारस करण्याची संधी मिळाली याचा आनंद आहे, अशी प्रतिक्रिया राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली आहे. बुधवारी महायुतीच्या तिन्ही नेत्यांनी राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा केला असून गुरुवार, ४ डिसेंबर रोजी सरकारचा शपथविधी पार पडणार आहे. दरम्यान, महायुतीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत बोलताना शिंदेंनी ही प्रतिक्रिया दिली.
 
एकनाथ शिंदे म्हणाले की, "आम्ही राज्यपाल महोदयांची भेट घेऊन महायुतीचे सरकार स्थापन करण्याची परवानगी मागितली. उद्या संध्याकाळी ५.३० वाजता आझाद मैदानावर शपथविधी होणार आहे. अडीच वर्षांपूर्वी याच ठिकाणी देवेंद्रजींनी मुख्यमंत्रीपदासाठी माझ्या नावाची शिफारस केली होती आणि आज आम्ही त्यांच्या नावाला पाठिंबा दिला आहे. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात हे सरकार स्थापन होत आहे, याचा आनंद आहे. देवेंद्रजींना पाच वर्षांचा अनुभव आहे. आमच्या अडीच वर्षातही त्यांचा अनुभव आम्हाला कामात आला. आता पुन्हा मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या नावाची शिफारस करण्याची मला संधी मिळाली, याचा आनंद आहे. त्यांचा पुढचा प्रवास यशस्वी, राज्याचा विकास करणारा आणि सर्वसामान्यांना न्याय देणारा ठरावा," अशा शुभेच्छा त्यांनी फडणवीसांना दिल्या.
 
हे वाचलंत का? -   महाराष्ट्राचा नावलौकिक सांभाळत देशात नंबर एकचे राज्य बनवू : अजित पवार
 
ते पुढे म्हणाले की, "आतापर्यंतच्या इतिहासात महायुतीला एवढे बहुमत कधीही मिळाले नव्हते. महाराष्ट्रातील तमाम जनतेने महायुतीवर मतांचा वर्षाव केला आणि महायुतीला दैदीप्यमान विजय मिळाला. यामागे गेल्या अडीच वर्षांचे काम आहे. मला काय मिळाले यापेक्षा महाराष्ट्राच्या जनतेला काय मिळाले, हे आमच्यासाठी महत्वाचे होते. सर्वसामान्यांचे सरकार म्हणून आम्ही काम केले. महाविकास आघाडीने थांबवलेले काम आम्ही मार्गी लावले. आमच्या कामांवर विश्वास ठेवून त्याची पोचपावती जनतेने आम्हाला दिली. आमची जबाबदारी आणखी वाढली आहे," असे ते म्हणाले.
 
माझ्या शपथविधीबाबत सायंकाळपर्यंत कळेल!
 
दरम्यान, एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार की, नाही याबाबत सायंकाळपर्यंत कळणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावर अजित पवार म्हणाले की, शिंदे शपथ घेणार की, नाही हे सायंकाळपर्यंत कळेल. पण मी थांबणार नाही. मी शपथ घेणार आहे. त्यानंतर दादांना सकाळी आणि सायंकाळी शपथ घेण्याचा अनुभव आहे, अशी कोपरखळी शिंदेंनी लगावली.
 
 
 
Powered By Sangraha 9.0