नागपूर : काँग्रेसने ईव्हीएमवर आरोप करणे बंद करून दोन गोष्टींसाठी माफी मागायला हवी, असा हल्लाबोल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने काँग्रेसला दिलेल्या उत्तरावर त्यांनी प्रतिक्रिया दिली. बुधवार, २५ डिसेंबर रोजी नागपूर पत्रकार संघाने आयोजित केलेल्या मीट द प्रेसमध्ये ते बोलत होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "ईव्हीएमध्ये छेडछाड होऊ शकत नाही, हे काँग्रेस पक्षाला माहिती आहे. काँग्रेसची ही एक नीती आहेत. निवडणूकीत पराभूत झाल्यास ते ईव्हीएमवर आरोप करतात आणि विजयी झाले तर लोकशाहीचा विजय झाला, असे सांगतात. पण आता काँग्रेसला उत्तर देण्यासाठी माझी गरज नाही आणि निवडणूक आयोगाचीही गरज नाही. ओमर अब्दुल्ला आणि ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसला उत्तर दिले आहे. काँग्रेसने ईव्हीएमवर आरोप करणे बंद केले पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट सांगितले आहे."
हे वाचलंत का? - लाडकी बहिण योजना! आधार लिंकमुळे पैसे रखडलेल्या महिलांना पैसे मिळणार
"काँग्रेस पक्षाने दोन गोष्टींसाठी माफी मागितली पाहिजे. काँग्रेसने वारंवार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला. त्यांना निवडणूकीत जिंकू दिले नाही, त्यांना अपमानित केले, त्यांचे स्मारक बनवण्यासाठी सुईच्या टोकाएवढी जागासुद्धा दिली नाही. काँग्रेसने अनेक लोकांना भारतरत्न दिला. पण भारताचे रत्न असलेल्या बाबासाहेबांना त्यांनी हा सन्मान दिला नाही. बाबासाहेबांची एकही स्मृती त्यांनी स्मृती स्थळाच्या रुपात विकसित केली नाही. काँग्रेसला कायम नेहरू गांधी परिवारापेक्षा कोणीही मोठे होऊ नये, अशी भीती असते. त्यामुळे त्यांनी बाबासाहेबांना अपमानित केले. याशिवाय इतका मोठा राष्ट्रीय पक्ष असूनही काँग्रेसने अमित शाहजींचे भाषण एडिट करून चालवले. यात संसदेचा वेळ वाया घालवून देशातील लोकांना भरकटवण्याचा प्रयत्न केला. भाजप पक्ष, अमितभाई शाह आणि नरेंद्र मोदीजी स्वप्नातही भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करू शकत नाही. काँग्रेसच्या पायाखालची जमीन सरकली असून ती जमीन मिळवण्यासाठी ते हे सगळे प्रयत्न करत आहेत," अशी टीका त्यांनी केली.