मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Dr. Mohanji Bhagwat Amravati News) "धर्माचे रक्षण झाले पाहिजे. तो धर्म राखला पाहिजे. धर्माचे आचरण हेच धर्माचे रक्षण.", असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी केले. रविवार, दि. २२ डिसेंबर रोजी अमरावती येथे महानुभाव आश्रमाचा शताब्दी महोत्सव संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते.
उपस्थितांना संबोधत ते म्हणाले, "धर्म हा पुस्तकात किंवा भाषणात नसतो. धर्म सृष्टीला धारण करतो, सृष्टीला धर्माचे आचरण धारण करावे लागते. धर्म हा समजवावा लागतो, तो निट समजला नाही तर धर्माच्या अर्धवट ज्ञानाने अधर्म होतो. जगामध्ये धर्माच्या नावाखाली जितके अत्याचार झाले. ते चुकीच्या समजुतीमुळे अर्धवट ज्ञानामुळे झाले आहेत. धर्म समजवायचे काम करणारे संप्रदाय असावे लागतात, नुसते पंथ असून चालत नाहीत. ज्या पंथाला विवेक प्राप्त होतो, त्याला आपण संप्रदाय म्हणतो."
पुढे ते म्हणाले, "आचरण, प्रबोधन, संशोधन हे जिथून चालतं, त्या मार्गाने धर्म चालतो, धर्माचे रक्षण तिथूनच होते. आपल्या देशातील संप्रदाय हेच करणारे आहेत. ज्यांनी हे केलं ते टिकले, ज्यांनी हे सोडून दिलं त्यांचं प्रयोजन संपलं. त्यामुळे प्रत्येक संप्रदायाच्या माणसाने हे लक्षात ठेवायला पाहिजे, की आपल्याला या मार्गाने चालायचं आहे."