मुंबई : यंदा सणासुदीच्या काळात भारतीय रेल्वेने प्रवास सुलभ करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. रेल्वेने अतिरिक्त सेवेच्या मदतीने दुर्गा पूजा, दिवाळी आणि छठ पूजेच्या सणांनिमित्त प्रवास करणाऱ्यांना इच्छित गंतव्य स्थानी पोहोचविले आहे. दि. ०१ ऑक्टोबरपासून ते ०५ नोव्हेंबर २०२४ पर्यंत मागील ३६ दिवसांत रेल्वेने ४,५२१ विशेष रेल्वेगाड्यांमधून तब्बल ६५ लाख प्रवाशांना गंतव्य स्थानी पोहोचविले.
दरम्यान, रेल्वेच्या या विशेष प्रयत्नांमुळे लाखो प्रवाशांना आपापल्या नियोजित स्थळी पोहोचणे सोयीचे झाले. सणासुदीच्या वाढीव गर्दीच्या काळात असलेली वचनबद्धता दर्शवत सर्वांना प्रवासाची सोय उपलब्ध करून दिली व प्रवासही सुलभ केला. भारतीय रेल्वेच्या मागणीनुसार पुरवठा करण्यासाठी कार्यरत आहे. परिणामी, भारतीय रेल्वेकडून एका दिवसात १२०.७२ लाख प्रवाशांची वाहतूक करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे छठ पूजा साजरी करून परतणाऱ्या प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन ८ ते ११ नोव्हेंबर या काळात भारतीय रेल्वेकडून १६० पेक्षा जास्त विशेष गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ७३ टक्के वाढीसह रेल्वेने एकूण 7,724 विशेष रेल्वेगाड्यांची घोषणा केली. गेल्या चार दिवसांत छठ पूजेसाठी निघालेल्या प्रवाशांना आपापल्या नियोजित स्थळी पोहोचता यावे म्हणून प्रति दिन सरासरी १७५ विशेष रेल्वेगाड्या चालविण्यात आल्या आहेत.