तब्बल १३ वर्षांनंतर टाटा समूहात नवीन बदल; नोएल टाटा दुहेरी नेतृत्व करणार!

05 Nov 2024 12:58:47
noel-tatas-entry-in-the-board-of-tata-sons


मुंबई :      देशातील प्रसिध्द उद्योगपती रतन टाटा यांच्या निधनानंतर टाटा समूहाची सुत्रे नोएल टाटा यांच्याकडे सोपविण्यात आली. नोएल टाटा यांनी टाटा समूहाच्या नेतृत्वात नवा महत्त्वपूर्ण बदल केल्याचे पाहायला मिळत आहे. दि. ०१ नोव्हेंबर रोजी नोएल टाटा यांचा टाटा सन्सच्या संचालक मंडळात समावेश करण्यात आला आहे. दिवाळीच्या पूर्वसंध्येला झालेल्या टाटा सन्सच्या व्हर्च्युअल बोर्डाच्या बैठकीत ऑनलाइन ठरावाद्वारे हा निर्णय घेण्यात आला, असे द इकॉनॉमिक टाइम्सने सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे.


दरम्यान, याआधीच नोएल टाटा यांची टाटा सन्सच्या कंट्रोलिंग युनिट टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. या नियुक्तीसह सन २०११ पासून टाटा ट्रस्ट आणि टाटा सन्स या दोन्ही मंडळांवर एकाच वेळी सेवा करणारे ते टाटा कुटुंबातील पहिले सदस्य बनले आहेत. दुहेरी भूमिका या महाकाय समूहाच्या क्रियाकलापांवर कुटुंबाचे बारीक लक्ष ठेवण्याचे सूचक बनले आहे. टाटा सन्समध्ये टाटा ट्रस्टचा ६६ टक्के कंट्रोलिंग स्टेक असून तब्बल १३ वर्षांनंतर नियमात बदल झाला आहे.


एकाचवेळी दोन पदे भूषवणारे नोएल टाटा कोण आहेत?

६७ वर्षीय नोएल टाटा हे दिवंगत रतन टाटा यांचे सावत्र भाऊ आहेत. ट्रेंट, व्होल्टासचे अध्यक्ष तर टायटन व टाटा स्टीलचे उपाध्यक्ष यांसह टाटा समूहाच्या किरकोळ आणि गुंतवणूक उपक्रमांमध्ये त्यांच्या व्यावसायिक कौशल्य आणि यशासाठी ते फार पूर्वीपासून ओळखले जातात. रतन टाटांच्या निधनानंतर त्यांनी टाटा समूहाची सूत्रे हाती घेतली. आता नवीन नियुक्तीनंतर टाटा ट्रस्ट आणि टाटा सन्स या दोन्ही मंडळांवर एकाच वेळी पद भूषविणार टाटा कुटुंबातील पहिले सदस्य बनले आहेत.
 

 
 
Powered By Sangraha 9.0