दरम्यान, एफपीआयने ऑक्टोबर महिन्यात सुमारे ११.२ अब्ज डॉलर काढले आहेत. देशांतर्गत बाजारातील उच्च मूल्यमापन आणि चिनी समभागांचे आकर्षक मूल्यांकन यामुळे एफपीआय भारतीय बाजारपेठेत विक्रेते राहिले आहेत. यापूर्वी, विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी मार्च २०२० मध्ये शेअर्समधून ६१,९७३ कोटी रुपये काढले होते. देशांतर्गत आघाडीवर एफपीआय महागाईचा कल, कंपन्यांचे तिमाही निकाल आणि सणासुदीच्या मागणीच्या आकडेवारीवर लक्ष ठेवेल, असा अंदाज बाजार तज्ज्ञांकडून वर्तविण्यात येत आहे.
एफपीआयने सप्टेंबरमध्ये समभागांमध्ये ५७,७२४ कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. गुंतवणुकीचा हा नऊ महिन्यांचा उच्चांक होता. एप्रिल-मे मध्ये ३४,२५२ कोटी रुपये काढल्यानंतर एफपीआय जूनपासून सतत खरेदी करत होते. भविष्यात भू-राजकीय घडामोडी, व्याजदरातील चढ-उतार, चिनी अर्थव्यवस्थेतील प्रगती आणि अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीचा निकाल यासारख्या जागतिक घडामोडी भारतातील विदेशी गुंतवणुकीला आकार देतील, असे मत बाजार विश्लेषकांनी मांडले आहे.