मुहूर्त ट्रेडिंगनंतर बाजाराची दिशा कशी असेल, 'या' घडामोडींवर असतील गुंतवणूकदारांच्या नजरा!

    03-Nov-2024
Total Views |
market-outlook-the-results-of-the-us-presidential-elections


मुंबई :      नवीन संवत वर्षाच्या सुरूवातीला बाजाराची दिशा नेमकी कशी असेल, याबाबत बाजार विश्लेषकांनी अंदाज वर्तविला आहे. दोन दिवसांपूर्वीच देशातील दोन प्रमुख भांडवली बाजार बीएसई, एनएसईने लक्ष्मीपूजनानिमित्त एक तासांचा मुहूर्त ट्रेडिंग आयोजित केला होता. या व्यापारी सत्रासह नवीन संवत २०८१ ची सुरुवात झाली. आता बाजारातील वातावरण नेमकं कसं असणार, याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे.




दरम्यान, अमेरिकेत होऊ घातलेल्या अध्यक्षीय निवडणुका, अमेरिकन मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हचाय व्याजदरांबाबत निर्णय, परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदार(एफपीआय) यांच्या हालचाली व देशांतर्गत कंपन्यांचे तिमाही निकाल यासर्वांचा एकंदरीत परिणाम आगामी दिवसात बाजारात दिसून येणार आहे. ५ नोव्हेंबर रोजी अमेरिकेत अध्यक्षीय पदाच्या निवडणूका होणार आहेत, त्यामुळे याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष असून शेअर बाजाराची दिशा या घडामोडी ठरवतील, असे मत बाजार विश्लेषकांनी व्यक्त केले आहे.

एकूणातच, आगामी आठवडा घटनांनी भरलेला असेल, असे तज्ज्ञांनी सांगताना आठवडाभरात अनेक मॅक्रो इकॉनॉमिक डेटा येणार आहेत, जो बाजाराच्या दिशेसाठी महत्त्वाचा असेल. याशिवाय जागतिक कलही बाजाराला दिशा देईल., असेही त्यांनी म्हटले आहे. आगामी आठवडा जागतिक आघाडीवर महत्त्वाचा ठरणार असून सर्वांच्या नजरा अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीकडे लागल्या आहेत. याशिवाय अमेरिकन फेडरल ओपन मार्केट कमिटीची बैठक महत्त्वाची ठरणार आहे. भू-राजकीय दबाव आणि कच्च्या तेलाच्या किमतींचाही बाजारावर परिणाम होईल, असे स्वस्तिका इन्व्हेस्टमार्ट लिमिटेडचे ​​संशोधन प्रमुख संतोष मीना म्हणाले.