ते देशासाठी लढले, ते अमर हुतात्मे झाले!

Total Views |

Shaitan Singh Birthday
 
फेब्रुवारी 1963 साली भारतीय सैन्याच्या शोधपथकांनी रेझांग ला भागात जाऊन मेजर शैतान सिंह आणि त्यांच्या शूर जवानांचे मृतदेह शोधून तळावर आणले. अति हिमवर्षावामुळे तीन महिन्यांपर्यंत कोणतेही शोधपथक त्या भागात जाऊच शकले नव्हते. मेजर शैतान सिंहांना ‘परमवीर चक्र’ हा सर्वोच्च सन्मान बहाल करण्यात आला. दि. 1 डिसेंबर 1924 हा मेजर शैतान सिंहांचा जन्मदिवस. म्हणजेच दि. 1 डिसेंबर 2024 हा त्यांच्या जन्मशताब्दीचा दिवस होय. त्यानिमित्ताने...
 
पल्या देशाच्या प्रत्येक प्रांतातल्या एखाद्या विशिष्ट भागात क्षात्रतेजाची मोठी परंपरा असल्याचे दिसून येते. महाराष्ट्राच्या मावळ भागातल्या योद्ध्यांनी शिवछत्रपती आणि बाजीराव पेशवे यांच्या नेतृत्वाखाली प्रचंड पराक्रम गाजवले.
 
पुढे इंग्रजांच्या सेनापतित्वाखाली भारताच्या सर्व प्रांतांतील सैनिक युरोपात फ्रान्समध्ये, आफ्रिकन इजिप्तच्या वाळवंटी भागात आणि आशियात तुर्कस्तान आणि पॅलेस्टाईनमध्ये लढले. जरी ते इंग्रज मालकांचे परतंत्र भारतीय गुलाम म्हणून लढत असले, तरी क्षात्रतेजात ते ब्रिटिश, फ्रेंच किंवा अमेरिकन सैनिकांइतकेच तिखट होते. किंबहुना, अनेक रणांगणांवर असेही घडले आहे की, समोरच्या जर्मन शत्रूंचा पहिला असह्य मारा भारतीय सैनिक आपल्या छातीवर झेलायचे आणि मग किंचित उणा झालेल्या आघाताला तोंड द्यायला ब्रिटिश सैनिक पुढे सरसावायचे. अनेक संस्थानांच्या राजे-महाराजे-नबाब यांची संस्थानी सैन्येदेखील ब्रिटिश भारतीय सैन्यांच्यासोबत परदेशी रणांगणांवर लढली. कोणीही, कुठेही लढण्यात कमी पडले नाहीत. महाराष्ट्रातले मराठे, पंजाबातले शीख आणि जाट, राजस्थानातले राजपूत, काश्मीरातले डोगरा, उत्तर भारतातले पूरबिये (ज्यांना आपण चुकीने पुरभय्ये म्हणतो), कर्नाटकच्या कोडागू (भ्रष्ट उच्चार कूर्ग) भागातले कोडावा, तामिळनाडूतले गौडा, केरळमधले थेवर असे सगळे लोक इंग्रजांच्या सैन्यातून इंग्रजांच्या शत्रूंशी कडक झुंजले. इंग्रजांनी त्यांच्या साम्राज्याच्या हिताच्या दृष्टीने या वेगवेगळ्या प्रांतांच्या सैन्यांची रचना केलेली होती. उदा. मराठ पलटण असे म्हटल्यावर त्यात महाराष्ट्रातल्या सैनिकांची, त्यातही विशेषत: मराठा या ज्ञाति समाजातल्या सैनिकांची भरती केलेली असे. त्यांचा कमांडिंग ऑफिसर हा मात्र इंग्रजच असे. कोणत्याही भारतीय पलटणीत भारतीय माणूस हा फक्त सैनिक - सेपॉय असे. त्याला अधिकारी पद कधीच दिले जात नसे. ही स्थिती किंवा हे धोरण 1940 सालानंतर इंग्रजांना नाईलाजाने बदलावे लागले. कारण, हिटलरच्या झंजावाताने इंग्रजांचे प्राण कंठाशी आले होते. त्यांना लढायला, नेतृत्व करायला आणि मरायला मुबलक माणसे हवी होती. म्हणून त्यांनी भारतीय सैनिकांना, अधिकारी पदावर बढती देण्याचा आणि सुशिक्षित भारतीय तरुणांना थेट अधिकारी म्हणून भरती करण्याचा निर्णय घेतला. जो भारताच्या पथ्यावर पडला. कारण, त्यामुळे 1947 साली स्वतंत्र भारताला अतिशय सुसज्ज, आधुनिक, प्रशिक्षित आणि महायुद्धाचा अनुभव गाठीशी असलेले सैन्य आपोआपच मिळाले. ‘जनरल कोदंडेरा मदाप्पा (के. एम.) करिअप्पा या महान सेनापतीने स्वतंत्र भारतीय सैन्याच्या पुनर्रचनेचे अतिशय किचकट काम फार कुशलतेने पार पाडले. फाळणीमुळे सैन्यदलांमधल्या अनेक पलटणी, अनेक सेनापती आणि सैनिक, अनेक महत्त्वाची लष्करी ठाणी, खूप सारे युद्धसाहित्य हे पाकिस्तानकडे गेले होते. त्याचप्रमाणे संस्थाने विलीन झाल्यामुळे अनेक संस्थानी सैन्यांची लष्करी दले मूळ भारतीय सैन्यदलांमध्ये योग्यरितीने मिळवून घ्यायची होती. जनरल करिअप्पा आणि त्यांच्या साहाय्यक लोकांनी हे प्रशासकीय काम कोणत्याही मुरब्बी नागरी प्रशासकीय अधिकार्‍याच्या इतक्याच कौशल्याने आणि लष्करी पद्धतीने झपाट्याने पार पाडले. या अजोड कामगिरीबद्दल त्यांना ‘फील्ड मार्शल’ हा सर्वोच्च लष्करी किताब केव्हाच मिळायला हवा होता. तो अखेर 1986 साली राजीव गांधींच्या पंतप्रधान कारकीर्दीत त्यांना मिळाला.
 
तर ‘मराठा रेजिमेंट’, ‘शीख रेजिमेंट’, ‘राजपूत रेजिमेंट’ या भारतीय सैन्यातल्या अत्यंत नामवंत सैन्य तुकड्यांप्रमाणेच ‘कुमाऊं रेजिमेंट’ हीदेखील एक फार प्रख्यात अशी पराक्रमी रेजिमेंट आहे. भारताच्या उत्तराखंड राज्यात कुमाऊं नावाचा एक भाग आहे. आपण सर्वांनी नैनिताल हे एक प्रसिद्ध पर्यटनस्थळ नक्कीच ऐकले, पाहिले असेल. ते नैनिताल हे ठिकाण कुमाऊं भागातले मुख्य शहर आहे. आल्मोडा, पिठौरागढ, राणीखेत इत्यादी ठिकाण कुमाऊंमध्येच येतात. ‘जिम कॉर्बेट नॅशनल पार्क’ हे प्रसिद्ध अभयारण्य इथलेच. भारतीय (म्हणजे हिंदू) पुराणांमध्ये हिमालयाच्या या भागाला ‘कूर्मांचल’ असे नाव आहे. त्याचा अपभ्रंश झाला ‘कुमाऊं.’ इथल्या स्थानिक रहिवाशांना म्हणतात ‘कुमाऊंनी.’ हे लोक पक्के लढवय्ये आहेत.
 
भारतातल्या प्रत्येक प्रांतात जर लढवय्ये लोक आहेत म्हणजे लढाऊपणाच्या, झुंजारपणाच्या त्यांच्या परंपरा आहेत, तर मग हा देश मुघलांच्या आणि इंग्रजांच्या ताब्यात गेलाच कसा आणि का?
 
या प्रश्नाचे आध्यात्मिक उत्तर स्वामी विवेकानंदांनी आणि सामाजिक उत्तर डॉ. हेडगेवारांनी देऊन ठेवलेले आहे. स्वामीजींच्या उत्तराचा आशय असा की, “समुद्र हा अमर्याद शक्तिशाली असतो. पण, त्यालाही काळानुसार भरती-ओहोटी असतेच. तसाच सध्याचा काळा हा हिंदू समाजाच्या ओहोटीचा काळ आहे. परंतु, म्हणून आपण हातपाय गाळून न बसता, भरतीचा काळ यावा म्हणून सतत प्रयत्न करायचे.” डॉ. हेडगेवारांच्या म्हणण्याचा आशय असा की, “हिंदू समाजाची राष्ट्रीय भावना क्षीण झाली. एकरसतेची भावना क्षीण झाली. त्यातून समाजाचे संघटन विस्कळीत झाले. हा असंघटित, विस्कळीत समाज परकीय आक्रमणांना बळी पडला. त्यातून त्याची अधिकच अवनती होत राहिली.”
 
मंबाजीराजे भोसले हे कमी शूर नव्हते. दत्ताजीराजे जाधवराव हे काही कमी कर्तबगार नव्हते. पण, आपली तिखट तलवार कुणाच्या बाजूने आणि कुणाच्या विरोधात चालवायची, हेच त्यांना समजत नव्हते. म्हणून मंबाजीराजे आपल्या पुतण्या विरुद्ध अफजलखानाच्या सैन्यातून आणि दत्ताजीराजे आपल्या भाच्या विरुद्ध शाहिस्तेखानाच्या सैन्यातून लढले. शिवरायांचा पक्ष हाच खरा राष्ट्रीय पक्ष आहे, हे या काका-मामांना समजतच नव्हते.
 
कुमाऊं भागातल्या लढवय्यांनादेखील ते समजत नव्हते. मग काम, जो पगार देईल, त्यांच्या बाजूने तलवार गाजवायची. अशा पोटापाण्याच्या शोधात हिमालयाच्या पहाडी प्रदेशातले हे कुमाऊंनी लोक थेट हैद्राबादच्या निजामाच्या पदरीसुद्धा राहिले. निजामाच्या दरबारातला इंग्रज रेसिडेंट सर हेन्री रसेल यांच्या डोळ्यांत कुमाऊंनी लोकांचा पराक्रम भरला. त्याने खास स्वतःच्या देखरेखीखाली कुमाऊंनी लोकांची एक अख्खी ब्रिगेड उभी केली. एक ब्रिगेड म्हणजे सुमारे तीन ते पाच हजार सैनिक. तिला ‘रसेल ब्रिगेड’ असेच नाव मिळाले.
 
पुढे 1917 साली कुमाऊं प्रदेशात राणीखेत इथे ब्रिटिश भारतीय सैन्याची ‘कुमाऊं रायफल्स’ ही स्वतंत्र तुकडी उभी राहिली. पहिल्या आणि दुसर्‍या महायुद्धात कुमाऊं सैनिकांनी भरपूर पराक्रम गाजवला. भारत आणि पाकिस्तान स्वतंत्र झाल्यावर अवघ्या सव्वादोन महिन्यात पाकिस्तानने भारताच्या काश्मीरवर हल्ला चढवून तो प्रदेश जवळपास जिंकलाच होता. भारतीय सैन्याने त्वरेने प्रतिकार सुरू केला. ‘बडगामची लढाई’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या लढाईत ‘पहिली कुमाऊं’ आणि ‘चौथी कुमाऊं’ या दोन तुकड्यांनी अतुलनीय पराक्रम गाजवला. कमांडिंग ऑफिसर मेजर सोमनाथ शर्मा यांनी धैर्यशाली नेतृत्वाचा कळस गाठत अखेर बलिदान केले. त्यांना ‘परमवीर चक्र’ हा सर्वोच्च लष्करी सन्मान देण्यात आला. अशाप्रकारे स्वतंत्र भारतासाठी लढताना सर्वोच्च सन्मान मिळवण्याचा पराक्रम ‘कुमाऊं रेजिमेंट’ने केला. हे स्वतंत्र भारताचे पहिले ‘परमवीर चक्र.’
 
दि. 20 ऑक्टोबर 1962 या दिवशी चीनने भारतावर आकस्मिकपणे आक्रमण केले. या युद्घाच्या दोन आघाड्या होत्या. एक ईशान्य भारतातला आजचा अरुणाचल प्रदेश. त्याला तेव्हा ‘नॉर्थ ईस्ट फ्रंटियर एजन्सी’ म्हणजेच ‘नेफा’ असे नाव होते. बेसावध भारतीय सैन्याचा पराभव करत चिनी सैन्याने ‘तवांग’ हे भारतीय सीमेवरचे महत्त्वाचे ठाणे जिंकले. आता ते तेजपूरच्या परिसरात उभे राहिले. तेजपूर पडले तर भारताने ईशान्य भारत गमावला, अशी स्थिती निर्माण झाली.
 
इकडे वायव्येकडे जम्मू-काश्मीर राज्यातील लद्दाख (भ्रष्ट उच्चार लडाख) भागातील ‘अक्साई चीन’ या अतिदुर्गम, बर्फाळ, गारढोण प्रदेशावर चीन चालून आला. चुशूल या ठाण्याजवळ भारताने एक धावपट्टी उभारली होती. ती जिंकली किंवा उद्ध्वस्त केली की, ‘अक्साई चीन’ भारताच्या ताब्यातून गेल्यासारखाच होता. अशा अवघड समयी ‘कुमाऊं रेजिमेंट’ तिथे धाडण्यात आली. ‘कुमाऊं रेजिमेंट’च्या ‘सी’ कंपनीचे कमांडिंग ऑफिसर मेजर शैतान सिंह भाटी हे होते. मेजर शैतान सिंहांचे वडील पहिल्या महायुद्धात लढलेले होते. स्वतः शैतान सिंहांना 1956 सालच्या नागा बंडखोरांबरोबरच्या युद्धाचा आणि 1961 सालच्या ‘गोवा मुक्ति युद्धा’चा अनुभव होता. त्यामुळेच अपुरी आणि जुनाट युद्धसामग्री, अपुरे अन्न, उबदार कपड्यांचा अभाव, शत्रूच्या किमान सहा हजार सैनिकांसमोर फक्त 120 सैनिकांची एक कंपनी असा सगळाच प्रतिकूल, विपरीत मामला असतानाही मेजर शैतान सिंहांनी उत्कृष्ट मोर्चेबांधणी केली.
 
दि. 18 नोव्हेंबर 1962 या दिवशी पहाटे 3.30 वाजता चिन्यांनी रेझांग ला भागातून आक्रमण सुरू केले. चिन्यांकडे अत्याधुनिक अ‍ॅसॉल्ट रायफली होत्या, तर भारतीय सैनिकांकडे 1945 सालातल्या, एकावेळी एकच काडतूस डागू शकणार्‍या ‘थ्री-नॉट-थ्री’ रायफली होत्या. चिनी सैनिक समुद्राच्या लाटांच्या रचनेत (वेव्ह टेक्निक), एका पाठोपाठ एक रांग असे पुढे सरसावत होते. मेजर शैतान सिंग खरोखरच एखाद्या कर्दनकाळ सैनानासारखे लढत होते. आपल्या मोर्चांमधून फिरून आपल्या सैनिकांना धीर देत होते. ‘कालिका माता की जय’ ही ‘कुमाऊं रेजिमेंट’ची युद्धगर्जना सैनिकांना चेतवत होती. चिन्यांचे दोन कजाखी हल्ले आपण मारून काढले. पण, आता आपल्या 120 सैनिकांपैकी फारच थोडे जिवंत राहिले होते. मेजर शैतान सिंहांनी आपले मरण ओळखले आणि आपल्या उरलेल्या सैनिकांना माघार घेण्याचा हुकुम सोडला. पण, एकही जण माघारी फिरला नाही. लढाई संपली तेव्हा 120 जणांपैकी 114 जण ठार झाले होते आणि सहा जण युद्धकैदी बनले.
 
याच्या दुसर्‍याच दिवशी म्हणजे दि. 19 नोव्हेंबर रोजी चीनने एकतर्फी युद्धबंदी घोषित केली, जी दि. 21 नोव्हेंबर रोजीपासून अमलात आली. पुढे फेब्रुवारी 1963 साली भारतीय सैन्याच्या शोधपथकांनी रेझांग ला भागात जाऊन मेजर शैतान सिंह आणि त्यांच्या शूर जवानांचे मृतदेह शोधून तळावर आणले. अति हिमवर्षावामुळे तीन महिन्यांपर्यंत कोणतेही शोधपथक त्या भागात जाऊच शकले नव्हते. मेजर शैतान सिंहांना ‘परमवीर चक्र’ हा सर्वोच्च सन्मान बहाल करण्यात आला.
 
दि. 1 डिसेंबर 1924 हा मेजर शैतान सिंहांचा जन्मदिवस. म्हणजेच दि. 1 डिसेंबर 2024 हा त्यांच्या जन्मशताब्दीचा दिवस होय. मेजर साहेब, तुम्हाला एक कडक सॅल्यूट!

मल्हार कृष्ण गोखले

वीस वर्षाहून अधिक काळ चालू असलेल्या विश्वसंचार या लोकप्रिय सदरचे लेखक. विपुल प्रमाणात वृत्तपत्रीय लिखाण. आंतरराष्ट्रीय घडामोडीवर खुसखुशीत भाष्य. भारतीय इतिहास संकलन समितीच्या कोकण प्रांताचे सचिव. संस्कृत व समाजशास्त्र विषय घेऊन बी.ए.