मोदीजींच्या निर्णयांमुळे महाराष्ट्रातील कारखानदारी उभी : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

18 Nov 2024 14:38:35
 
Fadanvis
 
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या निर्णयांमुळे महाराष्ट्रातील कारखानदारी उभी आहे, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केले आहे. सोमवार, १८ नोव्हेंबर रोजी दौंड विधानसभेचे भाजपचे उमेदवार राहुल कुल यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते.
 
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "या निवडणूकीमध्ये राहुल कुल जुने सगळे रेकॉर्ड तोडणार आहेत. यावेळी मी राहुलदादांना मंत्री बनवायचे ठरवलेच आहे. पण माझी एक अट आहे. २० हजारांपेक्षा कमी मताधिक्य असेल तर राज्यमंत्री आणि २० हजारांपेक्षा जास्त मताधिक्य असेल तर कॅबिनेट मंत्री बनवेल. त्यामुळे नंतर माझ्याकडे तक्रार करू नका. आता गेम तुमच्याकडे आहे."
 
हे वाचलंत का? -  मंदाताई आमची फायरब्रँड नेता! बेलापूरमध्ये मुख्यमंत्री शिंदेंची जाहीर सभा
 
"आम्ही लहानपणापासून बारामतीचे नाव ऐकत होतो. तेव्हा आम्हाला वाटायचे की, इथे सगळे सुजलाम, सुफलाम आहे. पण मी मुख्यमंत्री झाल्यावर इकडेही दुष्काळी भाग असल्याचे लक्षात आले. इथे पाणी पोहोचले नाही. त्यानंतर ज्याप्रकारे इथे राहुलदादांनी पाण्यावर काम केले त्यासाठी मी त्यांच्या कामाला सॅल्यूट करतो. त्यांनी जलसंधारणाचा एक नवीन पॅटर्न तयार केला. या पॅटर्नला आता पेटेंट मिळाला आहे. आज पुणे-दौंड मार्गावर सहा पदरी ६ हजार कोटी रुपयांचा भारदस्त रोड तयार होत आहे. तसेच मी इथे एमआयडीसीसुद्धा देणारच आहे. परंतू, त्या एमआयडीसीमध्ये येण्यासाठी आता पुण्यातून हा सहा पदरी रोड झाल्याने उद्योगही येतील," असे त्यांनी सांगितले.
 
ते पुढे म्हणाले की,"आपले सरकार सातत्याने शेतकऱ्यांचा पाठीशी उभे आहे. गेली २०-२२ वर्षे आमच्या कारखान्यांवर आणि पर्यायाने आमच्या शेतकऱ्यांवर इन्कम टॅक्सची तलवार लटकली होती. कमीत कमी सहा वेळा पवार साहेब स्वत: प्रणव मुखर्जी आणि मनमोहन सिंग यांच्याकडे गेले. पण ही तलवार निघू शकली नाही. आमचे अमितभाई शाहा सहकारीता मंत्री झाले आणि त्यांनी एका झटक्यात १० हजार कोटी रुपयांचा शेतकऱ्यांचा इन्कम टॅक्स माफ केला. तसेच कोणी शेतकऱ्यांना जास्त एफआरपी दिल्यास त्यांना इन्कम टॅक्स लागणार नाही, असा नियमच तयार करून टाकला. आज उसाचे राजकारण हे भाजपवाल्यांना काय समजते, असे म्हणणाऱ्यांच्या नाकावर टिच्चून नरेंद्र मोदीजींच्या निर्णयांमुळे महाराष्ट्रातील कारखानदारी उभी आहे," असेही ते म्हणाले.
 
 
 
Powered By Sangraha 9.0