मंदाताई आमची फायरब्रँड नेता! बेलापूरमध्ये मुख्यमंत्री शिंदेंची जाहीर सभा
जे. पी. नड्डांची प्रमुख उपस्थिती
18-Nov-2024
Total Views | 56
ठाणे : मंदाताई आमची फायरब्रँड नेता आहे. त्या जे काही करतात ते जनतेसाठीच करतात. त्यामुळे या भागात त्यांची लोकप्रियता आहे, असे वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केले आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या प्रमुख उपस्थितीत बेलापूर विधानसभेच्या भाजप आणि महायूतीच्या उमेदवार मंदा म्हात्रे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत बोलत होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "मंदाताई आमची फायरब्रँड नेता आहे. त्या जे काही करतात ते जनतेसाठीच करतात. त्यामुळे या भागात त्यांची लोकप्रियता आहे. पण आपला आवाज आणि आपले काम त्यांनी कायम लोकांसाठी वापरला. त्यांनी स्वत:साठी कुठलाही स्वार्थ साधला नाही."
"प्रचाराच्या निमित्ताने मी संपूर्ण महाराष्ट्र पालथा घातला. मी घरात बसणारा मुख्यमंत्री नसून पायाला भिंगरी लावून राज्यभर फिरणारा मुख्यमंत्री आहे. घरात बसून कोमट पाणी प्या, फेसबुक लाईव्ह करा हे सांगणारा नाही तर फेस टु फेस काम करणारा आणि लोकांमध्ये जाणारा मुख्यमंत्री आहे. मेरी आवाज सुनो म्हणणारा नाही तर जनता की, आवाज सुननेवाला मुख्यमंत्री आहे," असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, "विरोधकांना टोमणे मारण्याशिवाय दुसरे काहीच येत नाही. टोमणे मारत मारत त्यांनी अडीच वर्ष घालवले आणि सगळे प्रकल्प बंद पाडले. कार्यकर्ता घरात नाही तर लोकांच्या दारात शोभून दिसतो, असे बाळासाहेब ठाकरे म्हणायचे. त्यामुळे आम्ही शासन आपल्या दारी कार्यक्रम सुरु केला. याचा ५ कोटी लाभार्थ्यांना फायदा झाला. याआधी सरकारी काम आणि सहा महिने थांब असा कारभार होता. त्यामुळे महाविकास आघाडी आणि महायूती सरकारने केलेल्या कामांचे दुध का दुध, पानी का पानी होऊ द्या," असे आव्हानही त्यांनी दिले.
...म्हणून एकनाथ शिंदेने धाडस केले आणि सरकार बदलले!
महाविकास आघाडीवर टीका करताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, "राज्यभरात महायूती सरकारबद्दल आनंदाचे वातावरण आहे. २०१९ ला शिवसेना-भाजपचे सरकार स्थापन व्हायला हवे होते. पण बाळासाहेबांनी ज्या काँग्रेसला विरोध केला त्यांच्यासोबत सरकार स्थापन करून त्यांनी स्वत:ची खुर्ची आणि स्वत:चा मोह सांभाळला. त्यामुळे एकनाथ शिंदेने धाडस केले आणि सरकार बदलून टाकले. राज्यात महायूतीचे सरकार आणले. जर सरकार बदलले नसते तर विविध योजना आल्या असत्या का? हे लोक विकास विरोधी व्हिजन ठेवून काम करणारे लोक आहेत. ते विकासाचे मारेकरी आहेत," अशी टीकाही त्यांनी केली.