उपमुख्यमंत्री फडणवीसांची भर पावसात सभा! म्हणाले, "आता जागा निवडून येणारच"

15 Nov 2024 17:35:10
 
Fadanvis
 
सांगली : पाऊस आला की, जागा निवडून येते असे नेते म्हणतात. त्यामुळे आता ही जागा निवडून येणारच, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केले आहे. शुक्रवार, १५ नोव्हेंबर रोजी शिराळा विधानसभेचे भाजपचे उमेदवार सत्यजित देशमुख यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते.
 
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भाषणाला सुरुवात होताच सभास्थळी पावसाला सुरुवात झाली. हाच धागा पकडून ते म्हणाले की, "आता सत्यजितदादांची जागा निवडून येणे पक्के आहे. कारण मी पावसात सभा घेतोय. पावसात सभा घेतली की, जागा निवडून येतात, असे नेत्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे हा शुभसंकेत आहे. तरीसुद्धा पाऊस पडो अथवा न पडो मतांचा पाऊस पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे."
 
हे वाचलंत का? -  मालेगावातील १२ युवकांची बनावट खाती! कोट्यवधींचा आर्थिक व्यवहार
 
"वाकुर्डे बुद्रुकची योजना १९९५ मध्ये आणली होती. पण १५ वर्षे ती कुलूपबंद होती. जयंतराव पाटलांसारखे मोठमोठे नेते असतानाही कुणी फुटकी कवडी दिली नाही. पण आमचे महायूतीचे सरकार आल्यानंतर मी मुख्यमंत्री असताना एका झटक्यात १०० कोटी रुपये दिले. या योजनेच्या निमित्ताने महाराष्ट्राचा निर्णय घेतला आणि इथे आता बंदिस्त पाईपच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाणी जाईल, असे मी तेव्हा सांगितले. या योजनेचा पहिला टप्पा संपला आहे. जोपर्यंत वाकुर्डीचे सगळे टप्पे पूर्ण होईपर्यंत पैशाची कमतरता पडू देणार नाही," असे आश्वासनही त्यांनी दिले.
 
ते पुढे म्हणाले की, "बस स्थानकाचे आधुनिकीकरण, उपजिल्हा रुग्णालयाचे काम, एमआयडीसीचे युनिट या सगळ्या शिराळ्याच्या मागण्या आमचे सरकार आल्यावर आम्ही पूर्ण करून दाखवू. पाच वर्षानंतर पुन्हा मते मागण्यासाठी आल्यावर यातील एकही मागणी शिल्लक नसेल," असेही ते म्हणाले.
 
 
 
Powered By Sangraha 9.0