छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर नावाचा सर्वात जास्त त्रास काँग्रेस आणि आघाडीला झाल, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली आहे. गुरुवार, १४ नोव्हेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर येथे महायूतीची प्रचारसभा पार पडली. यावेळी ते बोलत होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, "एकीकडे संभाजी महाराजांना मानणारे देशभक्त आहेत. तर दुसरीकडे, औरंगजेबाचे गुणगान गाणारे लोक आहेत. बाळासाहेब ठाकरेंनी या शहराला छत्रपती संभाजीनगर नाव देण्याची मागणी केली, हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. पण अडीच वर्षे महाविकास आघाडीची सत्ता असतानाही काँग्रेसच्या दबावामुळे या लोकांची हिंमत झाली नाही. परंतू, महायूती सरकारने या शहराला छत्रपती संभाजीनगर नाव दिले. आम्ही बाळासाहेब ठाकरेंची ईच्छा पूर्ण केली."
हे वाचलंत का? - महाविकास आघाडीची पंचसुत्री नव्हे, थापासुत्री! मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची टीका
"छत्रपती संभाजीनगर नाव दिल्याने सर्वात जास्त त्रास काँग्रेस आणि आघाडीला झाला. हा निर्णय बदलण्यासाठी लोक कोर्टापर्यंत गेलेत. ज्यांना संभाजी महाराजांच्या नावावर आक्षेप आहे आणि त्यांच्या मारेकऱ्यात आपला देव दिसतो ते लोक महाराष्ट्र आणि मराठी स्वाभिमानाच्या विरोधात उभे आहेत. अशा लोकांना महाराष्ट्र कधीच स्विकार करणार नाही. महाराष्ट्राला विकसित भारताच्या संकल्पाचे नेतृत्व करायचे आहे. भाजप आणि महायूती याच दिशेने काम करत आहे," असे ते म्हणाले.