खिचडी चोरांना १५०० रुपयांची किंमत कळणार नाही!

नितेश राणेंचा संजय राऊतांवर घणाघात

    10-Nov-2024
Total Views |
 
Nitesh Rane
 
मुंबई : गरीब कामगारांच्या खिचडीत भ्रष्टाचार करणाऱ्या संजय राऊतांच्या कुटुंबाला १५०० रुपयांची किंमत कळणार नाही. पण त्या १५०० रुपयांमुळे किती लोकांची दिवाळी गोड झाली हे त्यांना जाऊन विचारायला हवे, असा घणाघात भाजप नेते नितेश राणेंनी संजय राऊतांवर केला आहे. रविवार, १० नोव्हेंबर रोजी ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
 
नितेश राणे म्हणाले की, "मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेमुळे महाविकास आघाडीची झोप उडाली आहे. त्यामुळे ते महिलांसाठी कुठलीतरी महालक्ष्मी योजना आणून दरमहा ३ हजार रुपये देणार आहेत. पण जर तुम्हाला आमच्याच योजनेचे नाव बदलून तुमच्या जाहीरनाम्यात छापायचे होते तर लाडकी बहिण योजनेच्या विरोधात कोर्टात याचिका का दाखल केली? आम्ही लाडकी बहिण योजना पुढे घेऊन जाणार आहोत, असे संजय राऊत म्हणतात. पण ते ज्यांच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत त्या काँग्रेसच्या एका समर्थकाने ही योजना बंद पडण्यासाठी याचिका दाखल केली आहे. ती आधी मागे घ्या," असे ते म्हणाले.
 
हे वाचलंत का? -  महायूतीचं संकल्पपत्र म्हणजे काँग्रेसच्या खोट्या फॅक्टरीतील वचनं नाहीत!
 
ते पुढे म्हणाले की, 'राहुल गांधींनी लोकसभेला खटाखट अकाऊंटमध्ये पैसे येणार असे जाहीर केले आणि तेवढ्याच पटापट ते इटलीला निघून गेलेत. चुकून महाविकास आघाडीचे सरकार आल्यास या सगळ्या योजना पहिल्या ११ दिवसांत बंद करणार, असे उद्धव ठाकरेंनी दसरा मेळाव्यात सांगितले. त्यामुळे तुमचा हा खोटारडेपणा आता जनतेला कळला आहे. गरीब कामगारांच्या खिचडीत भ्रष्टाचार करणाऱ्या संजय राऊतांच्या कुटुंबाला १५०० रुपयांची किंमत कळणार नाही. पण त्या १५०० रुपयांमुळे किती लोकांची दिवाळी गोड झाली हे त्यांनी विचारायला हवे," असेही ते म्हणाले.
 
उलेमा बोर्ड ही दहशतवादी संघटना!
 
"आमच्यावर बंदी आणण्याची आणि आम्हाला अटक करण्याची मागणी करण्याची उलेमा बोर्डाची लायकी नाही. उलेमा बोर्ड किंवा मुस्लीम लॉ बोर्ड या सगळ्या दहशतवादी संघटना आहेत. दहशतवाद आणि जिहादला खतपाणी घालणाऱ्या या संघटना आहेत. यांच्या माध्यमातून देशाच्या विरुद्ध जिहाद तयार करणे आणि दहशतवादी तयार करण्यासाठी हे उलेमा बोर्डसारखे मुस्लीम बोर्ड तयार झाले आहेत. २३ तारखेनंतर हे कुठलेही बोर्ड महाराष्ट्रात दिसणार नाहीत," असे ते म्हणाले.
 
मनोज जरांगे आता २४ तास राजकारणी!
 
"मराठा आरक्षण हा विषय आणि मराठ्यांचे हित आता बाजूला राहिले असून मनोज जरांगे पाटील हे आता २४ तास राजकारणी झाले आहेत. सेटलमेंट बादशाह झाले आहेत. त्यामुळे त्यांच्याबद्दल कमी बोललेले बरे. मराठा समाजाला जे समजायचं होते ते आता समजले आहे," अशी टीकाही त्यांनी केली.