महायूतीचं संकल्पपत्र म्हणजे काँग्रेसच्या खोट्या फॅक्टरीतील वचनं नाहीत!
चित्रा वाघ यांचे काँग्रेसवर टीकास्त्र
10-Nov-2024
Total Views |
मुंबई : "महायुतीसाठी संकल्पपत्र म्हणजे फक्त कागदाचा डॉक्युमेंट नाही किंवा काँग्रेसच्या खोट्या फॅक्टरीसारखी खटाखट खोटी वचनं नाहीत. आमच्यासाठी संकल्पपत्र म्हणजे एक पवित्र डॉक्युमेंट आहे जे आपल्या आराध्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याला प्रगतशील बनवेल," असे वक्तव्य भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केले आहे. रविवार, १० नोव्हेंबर रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या हस्ते भाजपचे संकल्पपत्र प्रसिद्ध करण्यात आले. यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली.
चित्रा वाघ म्हणाल्या की, "भाजपचे संकल्प पत्र म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांनी दाखवलेल्या मार्गावरून वेगवान वाटचाल करण्यासाठी आखलेली योजना आहे. या संकल्पपत्रात सबका साथ सबका विकास हेच आमचं ध्येय आहे. प्रामुख्याने उल्लेख करायचा झाला तर आमच्या लाडक्या बहिणींना दरमहा २१०० म्हणजेच वर्षाला २५,२०० रुपये मिळणार. २०२७ पर्यंत ५० लाख महिलांना लखपती दीदी बनवणार, ५०० बचतगटांसाठी १००० कोटींचा फिरता निधी उपलब्ध होणार. शेतकऱ्यांना कर्ज माफी मिळणार. शेतकरी सन्मान निधीत वाढ होऊन १२,००० ऐवजी १५,००० रुपये मिळणार आणि आणि एमएसपीवर २० टक्के अनुदान देणार आहे."
"तसेच राज्यात जीवनावश्यक वस्तूंच्या किमती स्थिर राहणार, वीज बिलात ३० टक्के कपात होणार, सौर आणि अक्षय ऊर्जेवर भर देणार, वृद्ध पेन्शन धारकांना महिन्याला २१०० म्हणजेच वर्षाला २५,२०० रुपयांचा आधार मिळणार, १० लाख विद्यार्थ्यांना मिळणार १० हजार रुपये विद्यावेतन आणि २५ लाख रोजगार निर्मिती करणार, प्रत्येक जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज आकांक्षा केंद्र स्थापन करून १० लाख उद्योजक घडवणार, सरकार स्थापनेनंतर १०० दिवसांच्या आत 'व्हिजन महाराष्ट्र @२०२८' सादर करण्यात येईल," असे त्या म्हणाल्या.
त्या पुढे म्हणाल्या की, "सबका साथ सबका विकास याची खूनगाठ मनाशी बांधलेल्या भाजप आणि महायुतीसाठी संकल्पपत्र म्हणजे फक्त कागदाचा डॉक्युमेंट नाही किंवा काँग्रेसच्या खोट्या फॅक्टरी सारखी खटाखट खोटी वचनं नाहीत. तर आमच्यासाठी संकल्पपत्र म्हणजे एक पवित्र डॉक्युमेंट आहे जे आपल्या आराध्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याला प्रगतशील बनवेल," असेही त्या म्हणाल्या.