पुणे : बारामती लोकसभा मतदार संघातील बोपदेव घाटात एका युवतीवर सामूहिक अत्याचार करण्यात आला. त्यानंतर खासदार सुप्रिया सुळेंनी शरद पवारांसह घटनास्थळी भेट दिली. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी त्यांच्यावर टीका केली आहे.
रुपाली चाकणकर म्हणाल्या की, "संबंधित घटना घडून पाच दिवस झाले. पुण्यात असूनही स्वतःच्या मतदारसंघात घडलेल्या घटनेला भेट द्यायला बरेच दिवस गेले. मुळातच पोलिस पहिल्या दिवसापासून १२ टिम तयार करून युद्धपातळीवर तपास करीत आहेत. मग आपला हा दिखावा कशासाठी?" असा सवाल त्यांनी केला.
हे वाचलंत का? - "भाजपशी थेट लढाई असली की, काँग्रेस..."; हरियाणातील निकालानंतर खासदार प्रियंका चतुर्वेदींची टीका
"चंद्रपुरमध्ये कोरपना येथे १२ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करणारा शिक्षक हा युवक कांग्रेसचा शहराध्यक्ष आहे, याविरोधात आंदोलन कधी करणार? आपल्या सोशल मिडियाच्या प्रदेश सरचिटणीसवर महिलांचे अश्लील व्हिडीओ बनविणे ,पाठवणे, अश्लाघ्य कमेंट करणे यासाठी चार सायबर गुन्हे दाखल आहेत. पोलीस कोठडीही घेऊन आलेल्या या आरोपीला आपण नियुक्तीपत्र देता. नक्की कशाचे समर्थन करता? त्याच्याविरोधात आंदोलन कधी करणार?" असेही त्या म्हणाल्या.
त्या पुढे म्हणाल्या की, "कालच नगरमध्ये भानुदास मुरकूटेंवर लैंगिक अत्याचार गुन्हा दाखल झाला. ते आपल्यासोबतचे पदाधिकारी आहेत, यांच्याविरोधात आंदोलन, पत्रकार परिषद कधी घेणार? झोपी गेलेल्याला जागं करता येतं, झोपेचं सोंग घेणाऱ्यांना नाही," अशी टीकाही त्यांनी केली.