हरियाणात विकास नीती, महाराष्ट्रात महायूती! मुख्यमंत्री शिंदेंचा विश्वास

09 Oct 2024 13:08:27
 
Shinde
 
मुंबई : हरियाणामध्ये विकास नीती जिंकली असून महाराष्ट्रात महायूती जिंकणार आहे, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला. हरियाणामध्ये भाजपने तिसऱ्यांदा ऐतिहासिक विजय मिळवला आहे. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदेंनी महाराष्ट्रातील निवडणूकीवर भाष्य केलं.
 
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "हरियाणामध्ये विकास नीती जिंकलेली आहे. महाराष्ट्रातही विकास नीती आहेच. गेल्या दोन वर्षांत आम्ही महाविकास आघाडीने बंद पाडलेले प्रकल्प सुरु केलेत. दुसरीकडे, मोठ्या प्रमाणात उद्योगही आणले. तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना, मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना, मुलींचं उच्च शिक्षण, शेतकऱ्यांना वीजबिल माफ, तरुणांना काम, जेष्ठांना डीबीटीद्वारे पैसे अशा अनेक कल्याणकारी योजना आम्ही सुरु केल्या आहेत."
 
हे वाचलंत का? -  "काँग्रेस आणि उबाठाने एकमेकांना सल्ले देणं म्हणजे..."; नितेश राणेंचा टोला
 
"महाविकास आघाडीने त्यांचं अडीच वर्षातील काम सांगावं आम्ही आमच्या दोन वर्षातील कामाचा लेखाजोखा जनतेच्या दरबारात मांडू. त्यामुळे हरियाणाप्रमाणे महाराष्ट्रातदेखील विकास नीतीच्या जोरावर महायूती जिंकणार आहे, असा मला विश्वास आहे. महाराष्ट्रातील जनता विकास करणाऱ्यांच्या आणि फील्डवर काम करणाऱ्यांच्या पाठीशी उभी राहते. ती घरी बसणाऱ्यांच्या आणि फेसबूक लाईव्ह करणाऱ्यांच्या पाठीशी नाही. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणूकीत महाराष्ट्रातील जनता आमच्या दोन वर्षातील कामाची पोचपावती दिल्याशिवाय राहणार नाही," असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
 
 
 
Powered By Sangraha 9.0