"काँग्रेस आणि उबाठाने एकमेकांना सल्ले देणं म्हणजे..."; नितेश राणेंचा टोला

    09-Oct-2024
Total Views |
 
Nitesh Rane
 
मुंबई : काँग्रेस आणि उबाठाने एकमेकांना सल्ले देणं म्हणजे वर्गातील दोन ढ विद्यार्थ्यांनी नापास होण्यासाठी एकमेकांना मार्गदर्शन करण्यासारखं आहे, अशी टीका भाजप नेते नितेश राणे यांनी केली आहे. हरियाणातील निकालानंतर उबाठा गटाने काँग्रेवर टीका केली. यावरून राणेंनी त्यांच्यावर निशाणा साधला.
 
नितेश राणे म्हणाले की, "हरियाणामध्ये भाजपचा दारूण पराभव होणार, असं संजय राऊत घसा कोरडा होईपर्यंत ओरडत होते. पण शेवटी हरियाणा राज्यात भाजपने पुन्हा एकदा इतिहास रचला आहे. याबद्दल राऊतांना दु:ख झाल्याचं त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होतं. जम्मू काश्मीरमध्येसुद्धा सर्वात जास्त मतांची टक्केवारी भाजपचीच आहे. तर काँग्रेसला केवळ ६ जागा जिंकता आल्या. त्यामुळेच संजय राऊत सामनातून आणि पत्रकार परिषदेतून काँग्रेसवर डोळे वटारत होते. पण तुमच्यात आणि तुमच्या मालकामध्ये खरंच हिंमत असेल तर महाविकास आघाडीतून बाहेर येऊन स्वत:च्या जोरावर महाराष्ट्राची निवडणूक लढवून दाखवा."
 
हे वाचलंत का? -  "कालपर्यंत हम साथ साथ है म्हणणारे आता..."; उपमुख्यमंत्री फडणवीसांची टोलेबाजी
 
"भाजपने हरियाणा आणि जम्मू काश्मीरमध्ये स्वत:च्या ताकदीवर निवडणूका लढवल्या आहेत. त्यामुळे भाजपशी उबाठा गटाची तुलना करु नका. काँग्रेसने उबाठाला आणि उबाठाने काँग्रेसला सल्ले देणं म्हणजे वर्गातील दोन ढ विद्यार्थ्यांनी नापास होण्यासाठी एकमेकांना मार्गदर्शन करण्यासारखं आहे. लोकसभेत उबाठा गटाचा स्ट्राईक रेट वाईट होता आणि आता हरियाणमध्ये काँग्रेस नापास झाली आहे. त्यामुळे हे दोन्ही ढ विद्यार्थी आपसात भांडून जर स्वत:चेच कपडे फाडत असतील तर महाराष्ट्रातील जनता यांच्याकडे फक्त मनोरंजनाच्या पलीकडे बघत नाही," असेही ते म्हणाले.