नागपूर : कालपर्यंत हम साथ साथ है म्हणणारे आता हम तुम्हारे है कौन असं म्हणत आहेत, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी महाविकास आघाडीवर केली आहे. हरियाणातील विधानसभा निवडणूकीच्या निकालानंतर उबाठा गटाकडून काँग्रेसवर टीका करण्यात येत आहे. दरम्यान, यावर आता फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "हरियाणामध्ये कधी भाजप हरतो आणि आम्ही त्यांच्यावर हल्ला करतो यासाठी काँग्रेस, शरद पवार गट आणि उबाठा तयारीत होते. पण काल त्यांना ती संधी मिळाली नाही. देशाचा मूड काय आहे, हे त्यांच्या आता लक्षात आले आहे. त्यामुळे कालपर्यंत हम साथ साथ है म्हणणारे आता हम तुम्हारे है कौन असं म्हणत आहेत. या निवडणूकीमुळे लोकसभेत तयार करण्यात आलेला फेक नरेटिव्ह संपला, हे स्पष्ट झालं," असे ते म्हणाले.
हे वाचलंत का? - हरियाणातील निकालावरून राऊतांनी काँग्रेसला सुनावले खडेबोल, म्हणाले...
हा स्वप्नपूर्तीचा दिवस!
"मी वित्तमंत्री असताना आम्ही ८ नवीन वैद्यकीय कॉलेजची घोषणा केली होती. त्यातील ५ कॉलेज विदर्भातील आहेत. आज या सगळ्या कॉलेजची सुरुवात होत आहे. तसेच पाच वर्ष हायकोर्टपासून तर सुप्रिम कोर्टापर्यंत जाऊन मान्यता मिळवलेल्या नागपूर विमानतळाचेसुद्धा भूमिपूजन होत आहे. माझ्यासाठी हा स्वप्नपूर्तीचा दिवस आहे. नागपूरला देशातील आधुनिक विमानतळ उभं राहणार आहे," असेही ते यावेळी म्हणाले.
विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने महायूती आणि महाविकास आघाडीचे जागावाटप सुरु आहे. याबद्दल फडणवीसांना विचारले असता ते म्हणाले की, "महायूतीतील जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आहे. आम्ही ८० टक्के पेपर सोडवला आहे आणि २० टक्के पेपर लवकरच सोडवणार आहोत," असे त्यांनी सांगितले.