मुंबई : मंगळवारी हरियाणा आणि जम्मू काश्मीर विधानसभा निवडणूकांचे निकाल जाहीर झाले. यात हरियाणामध्ये भाजपने एकहाती विजय मिळवला. यावरून आता संजय राऊतांनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला आहे. तसेच या निकालातून आम्हाला बऱ्याच गोष्टी शिकता येतील, असे ते म्हणाले.
संजय राऊत म्हणाले की, "हरियाणा आणि जम्मू काश्मीर या दोन्ही राज्यात ९० आमदारांची विधानसभा होती. यातील एक राज्य इंडिया आघाडीकडे गेलं आणि एक राज्य भाजपकडे गेलं. हरियाणाचा पराभव हा दुर्दैवी आहे. हरियाणामध्ये समाजवादी पार्टी, आप, एखादी जागा शिवसेना आणि एनसीपीला मिळाली असती, तर याचा फायदा इंडिया आघाडीला झाला असता. पण आम्ही एकतर्फी जिंकू, आम्हाला कुणाची गरज नाही, असं काँग्रेसला वाटलं. जिथे काँग्रेस कमजोर असते तिथे ते प्रादेशिक पक्षांची मदत घेतात आणि जिथे त्यांना वाटतं की, आपण मजबूत आहोत तिथे ते स्थानिक पक्षांना महत्व देत नाहीत. या सगळ्याचा परिणाम हरियाणासारखा निकालावर होतो. तिथे भाजपचा विजय होईल असं सांगणारा एकही व्यक्ती मला भेटला नाही."
"हरियाणातील पराभव दुर्दैवी आहे, पण यातून आम्हाला बऱ्याच गोष्टी शिकता येतील. देशातील निवडणूका आम्हाला एकत्रच लढाव्या लागतील. कुणीही स्वत:ला मोठा भाऊ, छोटा भाऊ समजू नये. लोकसभेतील यश हे इंडिया आघाडीचं यश आहे. हरियाणातील निकालाचा महाराष्ट्रावर कोणताही परिणाम होणार नाही. इथे उद्धव ठाकरे आणि शरद पवार साहेबांसारखं नेतृत्व जागरूक आहे," असे ते म्हणाले.
काँग्रेसने भूमिका घ्यावी!
ते पुढे म्हणाले की, "काँग्रेसने यासंदर्भात निवडणूक आयोगाकडे काही तक्रारी केल्या. त्याचा विचार केला पाहिजे. हरियाणा हे ९० विधानसभेचं छोटं राज्य आहे. काही जातीपातीची गणितं असतात. काँग्रेसला ३६ जागा मिळाल्या आणि बहुमतापासून ९ जागा कमी पडल्या. आम्ही निराश झालेलो नाही. पण यातून अनेक राज्यातील निवडणूकांमध्ये काँग्रेसला एक भूमिका घ्यावी लागेल. काँग्रेसला देशभरात स्वबळावर लढायचं असल्यास त्यांनी तशी भूमिका घेतली पाहिजे. मग इतर पक्ष आपापला निर्णय घेतील," असेही संजय राऊत म्हणाले.