मुंबई : हरियाणामध्ये भारतीय जनता पार्टीने ऐतिहासिक यश मिळवले असून महाराष्ट्रात हरियाणातील विजयाची पुनरावृत्ती होणार आहे, असा विश्वास भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी व्यक्त केला. हरियाणामध्ये भाजपने विजयाची हॅट्रिक केली आहे. यावर बावनकुळेंनी प्रतिक्रिया दिली.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, "लोकसभा निवडणुकीच्या वेळी काँग्रेसने मागासवर्गीय समाजाची दिशाभूल केली होती. मात्र, आता विरोधकांचा खोटारडेपणा जनतेसमोर उघड झाला आहे. मोदी सरकारच्या विकसित भारताच्या संकल्पाला साथ देत जनतेने भरभरून भाजपाच्या पारड्यात मतदान केल्यामुळे हरियाणा आणि जम्मू-काश्मीरमध्ये इतके मोठे यश मिळाले आहे."
हे वाचलंत का? - "जम्मू काश्मीरमध्ये कुणाचं सरकार बनतं हे महत्वाचं नाही तर..."; फडणवीसांची प्रतिक्रिया
"राहुल गांधींचे अमेरिकेतील आरक्षणाबाबतचे वक्तव्य ऐकल्यानंतर काँग्रेसचा आरक्षणविरोधी चेहरा समोर आला आहे. जीविताचे, मालमत्तेचे तसेच संविधानाचे रक्षण केवळ भाजपा करू शकते हा विश्वास जनतेच्या मनामध्ये निर्माण झाल्यामुळे महाराष्ट्रात त्याचे पडसाद उमटणार आहेत. राज्याच्या विकासासाठी डबल इंजिन सरकारची आवश्यकता आहे हे लक्षात घेऊन महाराष्ट्रातील मतदारही महायुतीला विजय प्राप्त करून देतील. विरोधकांचे घाणेरडे राजकारण महाराष्ट्रामध्ये हाणून पाडण्यासाठी भाजपा घर चलो अभियान राबविणार आहे. भाजपाचा प्रत्येक कार्यकर्ता तळागाळातील मतदारापर्यंत पोहोचून काँग्रेसने निर्माण केलेला संभ्रम दूर करून राज्य आणि केंद्र सरकारची विकास कामं पोहोचवेल," असेही त्यांनी सांगितले.