"जम्मू काश्मीरमध्ये कुणाचं सरकार बनतं हे महत्वाचं नाही तर..."; फडणवीसांची प्रतिक्रिया
08-Oct-2024
Total Views |
मुंबई : जम्मू काश्मीरमध्ये कुणाचं सरकार बनतं हे महत्वाचं नाही तर जम्मू काश्मीर आज भारताचा अविभाज्य अंग आहे, हे जगाच्या पाठीवर सर्व देशांनी मान्य केलं आहे, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली. मंगळवारी हरियाणा आणि जम्मू काश्मीर निवडणूकांचे निकाल जाहीर झाले. यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, " जम्मू काश्मीरमध्ये कुठला पक्ष जिंकला हे महत्त्वाचं नाही तिथे भारत आणि लोकशाही जिंकली आहे. कारण जे लोक म्हणत होते की रक्ताचे पाट वाहतील त्यांनी येऊन बघावं की, आम्ही काश्मीरमध्ये निवडणूक घेऊन दाखवली. आंतराराष्ट्रीय जगतात पाकिस्तान सांगत होता की, सेनेच्या माध्यमातून कब्जा केला आहे. त्या पाकिस्तानच्या थोबाडीत मारणारी निवडणूक आपण घेऊन दाखवली. जगाने मान्य केलं की, ३७० कलम हटवणं योग्य होतं. जम्मू काश्मीर भारताचं अविभाज्य अंग आहे. त्यामुळे जम्मू काश्मीरमध्ये कुणाचं सरकार बनतं हे महत्वाचं नाही तर जम्मू काश्मीर आज भारताचा अविभाज्य अंग आहे, हे जगाच्या पाठीवर सर्व देशांनी मान्य केलं आहे. त्यामुळे हा भारताचा विजय आहे," असे ते म्हणाले.
"राहुल गांधी विरोधी पक्षनेते झाल्यानंतर पहिली सलामी हरियाणाने दिली आहे. यानंतरची सलामी महाराष्ट्र देणार आहे. हा विजय भाजपाच्या कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढवणारा विजय आहे. हा विजय मूर्खांच्या नंदनवनात वावरणाऱ्यांना जमिनीवर आणणारा विजय आहे," अशी प्रतिक्रिया त्यांनी हरियाणामध्ये झालेल्या भाजपच्या विजयावर दिली आहे.