अंतराळ क्षेत्रात २००हून अधिक स्टार्टअप्स; साहस निधीसाठी १ हजार कोटींची तरतूद

07 Oct 2024 14:43:05
space startups central government


मुंबई :       केंद्र सरकारने अंतराळ स्टार्ट अप्सच्या साहस निधीसाठी १ हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. आगामी गगनयानाच्या पार्श्वभूमीवर अंतराळ क्षेत्रात २००हून अधिक स्टार्टअप्स निर्माण झाले आहेत, अशी माहिती केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान, अंतराळ विभाग राज्यमंत्री(स्वतंत्र प्रभार) डॉ. जितेंद्र सिंह यांनी दिली.




दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार अंतराळ क्षेत्राला सर्वोच्च प्राधान्य देत निर्णय घेण्यात आला आहे. सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळात प्राधान्यक्रमाच्या पहिल्या तीन ते चार क्षेत्रांपैकी अंतराळ क्षेत्र एक असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. मोदी सरकारच्या ३.० कार्यकाळातील पहिल्या १०० दिवसात हा निर्णय घेण्यात आला असून अंतराळ क्षेत्रात १०० टक्के परकीय थेट गुंतवणूक(एफडीआय)ला परवानगी दिली आहे.

चार वर्षांपूर्वी क्रांतिकारी पाऊल उचलत अंतराळ क्षेत्र खाजगी उद्योजकांना खुले करण्याचा निर्णय केंद्राने घेतला. अंतराळ क्षेत्रात १०० टक्के एफडीआय गुंतवणुकीच्या तरतुदीला सरकारने परवानगी दिली असल्याने नव्या उपक्रमांना आणि नव्या उद्योजकांना मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन मिळत आहे, असेही त्यांनी सांगितले.

गगनयानचा संदर्भ देत डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले की, वर्षाच्या अखेरीस किंवा पुढील वर्षाच्या सुरूवातीस व्योम मित्र या यंत्रमानवासह अंतिम चाचणी उड्डाण करण्याचा प्रयत्न करत आहे याकरिता सरकार प्रयत्नशील आहे. तसेच, पुढील वर्षभरात म्हणजे २०२५ मध्ये गगनयानद्वारे पहिल्या भारतीय मानवाला अंतराळात पाठवता येईल.





Powered By Sangraha 9.0