मैत्रीची सुरूवात! दिवाळी निमित्त भारत आणि चीनी सैन्यामध्ये मिठाईची देवाणघेवाण
31-Oct-2024
Total Views |
नवी दिल्ली : लदाख मधील नियंत्रण रेषेवरून भारत आणि चीन या दोन्ही देशांनी सैन्य मागे घेण्याचा निर्णय घेतल्या नंतर, आता दिवाळी निमित्त दोन्ही देश दिवाळी निमित्त मिठाईची देवाण घेवाण करीत आहेत. लदाखमधील चुशुल मालदो आणि दौलत बेग ओल्डी, अरुणाचल प्रदेशातील बंछा (किबुटूजवळ) आणि बुमला तसेच सिक्कीममधील नथुला या ठिकाणी मिठाईंची देवाण घेवाण करण्यात आली आहे. भारत आणि चीन या देशांमधल्या करारामुळे दोन्ही देशांचे संबंध पूर्ववत होतील अशी आशा व्यक्त केली जात आहे.
२१ ऑक्टोबर रोजी झालेल्या करारावर दोन्ही देशांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. दोन्ही देशांनी आपआपल्या लष्करी छावण्या डेपसांग आणि डेमचोक या पठारांवरून हटवल्या आहेत. लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी म्हणतात की, भारतीय सैन्य आपल्या चिनी समकक्षावर विश्वास पुनर्संचयित करण्याचा प्रयत्न करत आहे. ज्यावेळेस आम्ही एकमेकांच्या नजरेच्या टप्यात असू त्यावेळेस प्रक्रिया पूर्ण होईल.
भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यावर भाष्य करताना म्हणाले की, सैन्य मागारी घेण्याची प्रक्रिया तेव्हाच पूर्ण होईल जेव्हा चीनकडून ठोस पाऊलं उचलले जातील. डेपसांगच्या पठारावर असलेल्या चीनी फौजांचा वावर यामुळे अजूनही साशंकतेला वाव आहे. रशिया मध्ये झालेल्या ब्रिक्स परिषदेच्या पूर्वसंध्येला दोन्ही देशांमध्ये हा करार झाला. पंतप्रधान मोदी आणि शी जिनपींग यांच्या मध्ये बैठक पार पडली. या बद्दल बोलताना मोदी म्हणाले "सीमारेषेवर शांतता आणि स्थिरता टिकवून ठेवणे ही दोन्ही देशांची प्राथमिकता आहे आणि त्यासाठी दोन्ही देश कटिबद्ध आहेत."