तिमाही निकालानंतर 'हिंदुस्थान युनिलिव्हर' ५.८३% डाऊन; सलग चौथ्या दिवशी बाजारात पडझड

24 Oct 2024 18:05:25
hul quarterly result share down


मुंबई : 
   सलग चौथ्या दिवशी भारतीय शेअर बाजारात घसरण झाली आहे. सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही निर्देशांक लाल रंगात बंद झाले आहेत. पश्चिम आशियाई देशांमधील तणाव, एफपीआयकडून मोठ्या प्रमाणात होणारी समभाग विक्री या सर्व कारणांचा नकारात्मक परिणाम बाजारावर दिसून आला आहे. सेन्सेक्स ८०,०६५.१६ पातळीवर तर निफ्टी ५० २४,३९९.४० च्या पातळीवर बंद झाला.

 
 

दरम्यान, परकीय गुंतवणूकदारांकडून सुरू असलेला विक्रीचा सपाटा पाहता भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण होत आहे. याचा फटका देशांतर्गत गुंतवणूकदारांवर होताना दिसून येत आहे. चीनकडून स्वस्त व्याजावर कर्ज उपलब्ध करून देत परकीय गुंतवणूकदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करताना होत आहे. त्याचबरोबर, येऊ घातलेल्या अमेरिकन राष्ट्राध्यक्षीय निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प आणि कमला हॅरिस यांच्यातील वाढती स्पर्धा बाजारावर नकळत परिणाम करते आहे.

आज सेन्सेक्समध्ये १६.८२ अंकांनी घसरण तर निफ्टीत ३६.१० अंकांनी घसरण झाली आहे. सद्यस्थितीस बाजारात बँकिंग आणि वित्तीय क्षेत्रातील मोठी घसरण रोखण्यात यश मिळविले. बीएसईवर अल्ट्राटेक सिमेंटच्या शेअरमध्ये सर्वाधिक २.६६ टक्के वाढ झाली. तर दुसरीकडे, हिंदुस्थान युनिलिव्हरच्या समभागात सर्वाधिक घसरण(५.८१%) झाली. नेस्ले इंडिया, आयटीसी, मारुती सुझुकी, एशियन पेंट्स, टीसीएस, इन्फोसिस, एल अँड टी, कोटक बँक, एचसीएल टेक आणि टेक महिंद्रा या कंपन्यांचे समभाग कोसळले.

 
 
Powered By Sangraha 9.0