पुणे : संपूर्ण राज्याचे लक्ष असलेल्या बारामती विधानसभा मतदारसंघात यंदा काका विरुद्ध पुतण्या यांच्यात थेट लढत होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात शरद पवार त्यांचेच पुतणे युगेंद्र पवार यांना मैदनात उतरवणार असल्याची माहिती पुढे आली आहे.
लोकसभेप्रमाणेच विधानसभा निवडणूकीच्या वेळीसुद्धा बारामती विधानसभा मतदारसंघ चर्चेत आहे. लोकसभेत याठिकाणी सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यात नणंद विरुद्ध भावजय असा सामना रंगला होता. त्यानंतर आता विधानसभेत काका आणि पुतण्यात लढत होणार आहे.
हे वाचलंत का? - निवडणूकीच्या तोंडावर उद्धव ठाकरेंना धक्का! पोहरादेवीचे महंत सुनील महाराजांचा पक्षाला रामराम
बारामतीतून युगेंद्र पवारांना एबी फॉर्म देण्यात आल्याची माहिती सुत्रांकडून पुढे आली आहे. युगेंद्र पवार हे अजित पवारांचे पुतणे आहेत. काही दिवसांपूर्वी अजित पवार बारामतीतून लढणार नसल्याच्या बातम्या पुढे आल्या होत्या. परंतू, आज राष्ट्रवादी काँग्रेसने आपली पहिली उमेदवार यादी जाहीर केली असून यात अजित पवारांना बारामतीतून तिकीट देण्यात आले आहे. दरम्यान, आता अनुभवी अजित पवार आणि तरुण चेहरा असलेले युगेंद्र पवार यांच्यात बारामतीचा सामना रंगण्याची शक्यता आहे. या सामन्यात कोण बाजी मारणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.