मुंबई : पोहरादेवीचे महंत सुनील महाराज यांनी उबाठा गटाला रामराम ठोकला आहे. त्यामुळे ऐन निवडणूकीच्या तोंडावर उद्धव ठाकरेंना हा मोठा धक्का मानला जात आहे. उद्धव ठाकरेंची भेट होत नसल्याने आम्ही आमचे प्रश्न कुणाकडे मांडायचे? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
महंत सुनील महाराज म्हणाले की, "शिवसेनेत फूट पडल्यानंतर कठीण प्रसंगात मी उद्धव ठाकरेंना पाठिंबा दिला. बंजारा समाजाचं हित लक्षात घेऊन मी ३० सप्टेंबर २०२२ रोजी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर ९ जुलै रोजी उद्धव ठाकरे पोहरादेवीला दर्शनाकरिता आले. पोहरादेवीच्या मंदिरात त्यांनी बंजारा समाजाच्या प्रश्नांवर लक्ष देऊन त्यांना न्याय देणार असल्याचे सांगितले. त्यानंतर मागच्या फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात उद्धवसाहेब जनसंवाद यात्रेदरम्यान कारंजा आणि वाशिम येथे आले. केवळ या दोनच भेटी झाल्या."
"गेल्या १० महिन्यांपासून बंजारा समाजाचे प्रश्न घेऊन मी अनेकदा त्यांना मेसेज केले परंतू, त्याचं कोणतंही उत्तर मला मिळालेलं नाही. त्यामुळे जर उद्धवसाहेब आपल्याला वेळच देत नसतील तर बंजारा समाजाची आणि महंतांची त्यांना गरज नाही. यासाठी मी आज जड अंतकरणाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा राजीनामा दिला आहे," असे ते म्हणाले.
बंजारा समाजाला उमेदवारी द्या!
यावेळी महंत सुनील महाराज यांनी उबाठा गटाने बंजारा समाजाचा उमेदवार देण्याची मागणी केली आहे. ते म्हणाले की, "महाराष्ट्रात २३ मतदारसंघ बंजाराबहुल आहेत आणि १३ मतदारसंघांमध्ये बंजारा फॅक्टर निर्णायक ठरू शकतो. त्यामुळे केवळ शिवसेनेनेच नाही तर महाविकास आघाडीनेसुद्धा बंजारा समाजाला न्याय द्यावा, अशी आमची विनंती होती. किमान विदर्भात तीन जागा आणि मराठवाड्यात तीन जागा द्यावा, अशी आमची मागणी होती. परंतू, जर भेटच होत नसेल तर न्याय कुणाकडे मागायचा?" असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.