पुणे : कोई लौटा दे मुझे बीते हुए दिन, अशी उद्धव ठाकरेंची अवस्था झाली आहे, असा घणाघात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी केला आहे. तसेच काँग्रेस आणि शरद पवारांच्या दृष्टीने ठाकरेंची उपयुक्तता संपली असल्याचेही ते म्हणाले. त्यांनी शुक्रवारी पुण्यात माध्यमांशी संवाद साधला.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, "दसरा मेळाव्यातील उद्धव ठाकरेंचं भाषण म्हणजे हास्यजत्रा होती. शोले चित्रपटात जशी जेलरची परिस्थिती होती तशी त्यांची अवस्था झाली आहे. त्यांच्यासोबत कुणीच राहिलेलं नाही. ते एकटे पुढे जात आहेत. कोई लौटा दे मुझे बीते हुए दिन, अशी ठाकरेंची अवस्था झालीये. ज्यावेळी ठाकरेंनी शरद पवारांनी काँग्रेसचा हात पकडला त्यावेळी त्यांनी बाळासाहेबांच्या विचारांचा विचार करायला हवा होता," असे ते म्हणाले.
हे वाचलंत का? - लोकसभेच्या निकालाला काय म्हणायचं? EVM घोटाळा की, वोट जिहाद? किरीट सोमय्यांचा सवाल
ते पुढे म्हणाले की, "उद्धव ठाकरे दिल्लीला गेले पण त्यांना परत पाठवण्यात आलं. उद्धव ठाकरेंची काँग्रेसच्या दृष्टीने उपयुक्तता संपली आहे. शरद पवारांना भाजप शिवसेनेची यूती तोडायची होती. बाळासाहेब असताना ते जे करू शकले नाहीत ते त्यांनी आता पूर्ण केलं. पण आता त्यांनी उद्धवजींनाच बाजूला टाकलं. त्यांना आता सुप्रियाताईंना मुख्यमंत्री करायचं आहे. त्यामुळे ते उद्धव ठाकरेंचा फक्त निवडणूकीपुरता वापर करून घेतील," असेही ते म्हणाले.
मविआ सरकार महाराष्ट्राचा बट्टयाबोळ करेल!
"केंद्र आणि राज्य हे डबल इंजिन सरकार महाराष्ट्राच्या जनतेकरिता मजबूतीने काम करणार आहे. महाविकास आघाडीकडे केंद्रात सरकार नाही. त्यामुळे ते कधीही केंद्राचा सपोर्ट घेणार नाही. त्यामुळे चुकून मविआला मत गेलं तर ते महाराष्ट्राचा बट्टयाबोळ करतील," असेही ते यावेळी म्हणाले.