मुंबई : विधानसभा निवडणूकीनंतर राज्यात मनसे पक्ष सत्तेत असेल, असा विश्वास मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी व्यक्त केला आहे. तसेच टोलमाफी केल्याबद्दल त्यांनी राज्य सरकारचे आभारही मानले. त्यांनी बुधवारी माध्यमांशी संवाद साधला.
राज ठाकरे म्हणाले की, "आम्ही जोशात विधानसभा निवडणूका लढवणार आहोत. मी माझ्या सभेत जे बोललो ते माझ्या सहकाऱ्यांमध्ये उत्साह यावा यासाठी बोललो नाही तर मला माहिती आहे की, या विधानसभा निवडणूकीनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष सत्तेत असेल. महाराष्ट्र नवनिर्माण सेना सर्व राजकीय पक्षांपेक्षा जास्त जागा लढवणार आहे."
हे वाचलंत का? - "काँग्रेसच्या इशाऱ्यावर नाचणाऱ्यांनी दुसऱ्यांना..."; नितेश राणेंचा संजय राऊतांवर पलटवार
"टोलमाफीसाठी आमची सातत्याने मागणी होती. काँग्रेसचं सरकार होतं तेव्हापासूनच माझ्या सर्व महाराष्ट्र सैनिकांनी यासाठी सातत्याने प्रयत्न केले. आज सरकारने घेतलेल्या निर्णयाबद्दल मी त्यांचे आभार मानतो. पण मला काळजी फक्त एकाच गोष्टीची आहे ती म्हणजे निवडणुकीच्या तोंडावर टोलनाके बंद करायचे आणि निवडणुकीनंतर पुन्हा सुरु करायचे असं होऊन चालणार नाही आणि होऊ देणारही नाही," असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, "सरकारने घेतलेल्या निर्णयाचं लोकांना समाधान आहे. शेवटी किती पैसे येतात आणि कुठे जातात हे कळायला काही मार्गच नाही. आजपर्यंत हा सगळा व्यवहार कॅशमध्ये होत होता. यावर सगळेच राजकीय पक्ष गप्प बसलेले होते. आता श्रेय घेण्यासाठी अनेकजण येतील. परंतू, त्यांचा कधीच काही संबंध आलेला नाही. यासाठी कुणी आंदोलन केलं हे जगाला माहिती आहे," असेही ते म्हणाले.