हीच ती ही क्रांतीची वेळ, वचपा काढा! राज ठाकरेंचं मतदारांना आवाहन

12 Oct 2024 17:36:11
 
Raj Thackeray
 
मुंबई : हीच ती ही क्रांतीची वेळ आहे, वचपा काढा, असे आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केले आहे. दसऱ्याच्या मुहुर्तावर राज्यात चार दसरा मेळावे आयोजित करण्यात आले आहेत. दरम्यान, राज ठाकरेंनीदेखील पॉडकास्टच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला.
 
राज ठाकरे म्हणाले की, "दसरा म्हटला की, आपण सोनं लुटतो आणि एकमेकांना दरवर्षी शुभेच्छा देतो. महाराष्ट्राचं सोनं तर गेली अनेक वर्षे लुटलं जातंय आणि आम्ही फक्त एकमेकांना आपट्याची पानं देत आहोत. आपल्या हातात आपट्याची पानं सोडून दुसरं काही राहात नाही आणि बाकीचे सगळे सोनं लुटून चालले आहेत, पण आमचं दुर्लक्ष आहे. आम्ही कधी आमच्या स्वत:च्या आयुष्यात मश्गुल, तर कधी आम्ही जाती-पातीमध्ये मश्गुल. या लोकांकडे आमचं लक्ष राहणार कधी? आजचा दसरा खूप महत्वाचा आणि तो निवडणुकीच्या तोंडावर आहे, अशावेळी तुम्ही बेसावध राहून चालणार नाही. दरवर्षी तुम्ही बेसावध राहता आणि सगळे राजकीय पक्ष आपापले खेळ करत राहतात.
 
हे वाचलंत का? -  "काहीजण कशा-कशासाठी पावसात भिजतात, आपण...;" जरांगेंची शरद पवारांचे नाव न घेता टीका
 
"महाराष्ट्राची प्रगती कुठे चाललीये? नुसते रस्ते बांधणं आणि पुल बांधणं ही प्रगती नसते. प्रगती समाजाची व्हावी लागते. ज्यावेळी आपण परदेशातले देश पाहतो त्याला प्रगत देश म्हणतात. पण अजूनही आपण चाचपडतच आहोत. इतके वर्ष प्रगतीच्या थापा मारूनदेखील तुमच्यातला राग व्यक्त होताना कधी दिसत नाही. दरवेळी त्याच त्या लोकांना तुम्ही निवडून देता आणि कपाळावर पश्चातापाचा हात मारत राहता. तुम्ही ऐन मोक्याच्या वेळी मतदानाचं शस्त्र झाडावर नेऊन ठेवता आणि निवडणूका संपल्यावर बोलत राहता," असे ते म्हणाले.
 
हीच क्रांतीची वेळ!
 
ते पुढे म्हणाले की, "आज तुम्हाला संधी आहे. यावेळी तुम्ही मतदारांनी क्रांती केली पाहिजे. आजपर्यंत ज्या लोकांना तुम्ही सांभाळलं ते तुमच्या मतांशी प्रतारणा करत आले आहेत. तुम्हाला गृहीत धरलं गेलं आणि हेच महाराष्ट्राचं नुकसान करत आहे. महाराष्ट्रातील तरूण-तरुणी, शेतकरी आणि सर्वसामान्यांना माझी विनंती आहे की, यावेळी येणाऱ्या निवडणूकीमध्ये बेसावध राहू नका. तुमची शस्त्र उतरवा. ही क्रांतीची आणि वचपा घेण्याची वेळ आहे. गेली ५ वर्ष ज्यांनी तुमच्या मतांशी प्रतारणा केली, ज्यांनी तुमच्या मतांचा अपमान केला आणि तुम्हाला गृहीत धरलं. त्यांचा वचपा काढा. आज संध्याकाळच्या मेळाव्यांमध्ये एकमेकांची उणीदुणी काढतील पण त्यात तुम्ही कुठे नसणार? मी गेली अनेक वर्षे एका महाराष्ट्राचं स्वप्न पाहात आहे, ती साकारण्याची संधी मला मिळू दे, जगाला हेवा वाटावा असा महाराष्ट्र माझ्या हातून घडावा हेच माझं स्वप्न आहे. ती संधी मला द्या," असेही ते म्हणाले.
 
 
 
Powered By Sangraha 9.0