ईदच्या दिवशीच भयंकर बॉम्बस्फोट ; ५२ जणांचा मृत्यू!

    29-Sep-2023
Total Views |
pakistan bomb blast

नवी दिल्ली
: पाकिस्तानातील बलुचिस्तानमध्ये ५२ जणांचा मृत्यू झाला. या घटनेत ५० हून अधिक जखमी झाले आहेत. हे लोक पैगंबर मोहम्मद यांच्या जन्मदिनी निघालेल्या मिरवणुकीत सहभागी झाले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा आत्मघातकी हल्ला झाला आहे. दि. २९ सप्टेंबर रोजी बलुचिस्तानच्या मस्तुंग जिल्ह्यातील एका मशिदीजवळ बॉम्बस्फोट झाला.

ईदच्या मिरवणुकीत सहभागी झालेल्या जमावाला आत्मघातकी बॉम्बस्फोटाने लक्ष्य करण्यात आले. पाकिस्तानी वृत्तसंस्थानी दिलेल्या माहितीनुसार, मृतांचा आकडा जरी आता ५२ सांगण्यात येत असला तरी मृतांचा आकडा वाढू शकतो. मृतांमध्ये एका डीएसपी दर्जाच्या पोलिस अधिकाऱ्याचाही समावेश आहे.




बलुचिस्तानच्या मस्तुंग जिल्ह्यातील स्थानिक रुग्णालयाच्या डॉक्टरांनी पाकिस्तानी वृत्तसंस्थांना दिलेल्या माहितीनुसार, डझनभर लोकांवर उपचार केले जात आहेत. 20 हून अधिक जखमी गंभीर असून त्यांना क्वेटा येथील रुग्णालयात वैद्यकीय मदतीसाठी पाठवण्यात आले असल्याची माहितीही त्यांनी दिली. रुग्णालयाचे सीईओ म्हणाले, "मृतदेह आणि जखमींची वाहतूक करण्याची प्रक्रिया अजूनही सुरू आहे."

उपमहानिरीक्षक (डीआयजी) मुनीर अहमद यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, "हल्लेखोराने डीएसपीच्या वाहनाजवळ स्वत:ला उडवले." नवाज गिश्कोरी असे ठार झालेल्या डीएसपीचे नाव आहे. तो मिरवणुकीच्या बाजूला राहणार होता, पण आत्मघातकी स्फोटाचा बळी ठरला.