२०व्या शतकातच २१व्या शतकातील नव्या मुंबईचे स्वप्न पाहणारा नेता!

    14-Sep-2023   
Total Views |
Interview With BJP MLA Ganesh Naik

आक्रमक कामगार नेता, राज्य मंत्रीमंडळात विविध खात्यांचा पदभार यशस्वीपणे सांभाळलेला कर्तृत्ववान मंत्री आणि नवी मुंबईचे भाग्यविधाते अशी बहुरंगी ओळख प्राप्त झालेले नेते म्हणजे आमदार गणेश नाईक. गणेश नाईक हे गेल्या ४३ वर्षांपासून राजकारण आणि समाजकारणात सक्रिय असून विविध माध्यमातून त्यांनी राज्य आणि विशेषत्वाने नवी मुंबईसाठी केलेल्या कामांची आजही कौतुकाने चर्चा केली जाते. विकास करायचा असेल तर नाईलाजास्तव का होईना पण काही घटकांना हानी पोहचवून तो साध्य करावा लागतो या व्याख्येला नाईकांनी बदलून टाकलं. नवी मुंबईची रचना करताना शहराचं सौंदर्य आणि देखणेपण, नीटनेटकेपणा, सर्व घटकांना सामावून घेणाऱ्या सर्वसमावेशकता, भयमुक्त वातावरण, वाढत्या लोकसंख्येमुळे शहर बकाल न होऊ देता त्याची व्यवस्थितरीत्या केलेली देखभाल आणि सामाजिक आर्थिक सलोखा जोपासण्यासाठी घेतलेली मेहनत यातून आमदार गणेश नाईकांच्या दूरगामी दृष्टीकोनाची आणि कौशल्यपूर्ण नेतृत्वाची प्रचिती येते. आज गणेश नाईक वयाच्या ७४ व्या वर्षात पदार्पण करत असताना दै. मुंबई तरुण भारत'ने त्यांच्याशी साधलेला हा संवाद

तुम्ही आज ७४व्या वर्षांत पदार्पण करीत आहात. तुमच्याकडे पाहिल्यावर हे कुणी मान्य करणार नाही की, तुम्ही आयुष्याची ७३ वर्षं पूर्ण केलीत. तुमच्यातील या उत्साहाचं आणि चैतन्याचं उगमस्थान काय?

मन स्वच्छ ठेवलं की, जगातील सर्व बाबी तुमच्यासमोर सहजगत्या उपलब्ध होतात. माझे वडील कमी शिकलेले होते; पण त्यांची शिकवण चांगली होती. इतरांना त्रास देणं, हे पाप आणि त्यांना जगण्यासाठी मदत करणे, हे पुण्य इतकं साधं म्हणणं होतं. भोवतालच्या जगाचा आपल्यावर निश्चित परिणाम होतो. पण, तो कितपत होऊ द्यायचा, ते सर्वस्वी आपल्यावर अवलंबून आहे. सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेला आणि शिक्षण घेत असतानाच बंडखोर वृत्तीमुळे अन्यायाच्या विरुद्ध आवाज उठवण्याचे काम आम्ही करायचो. प्रामाणिकपणे आयुष्य जगणे, कुणाच्याही हक्कांवर गदा न आणता, आयुष्याच्या वाटेवर मार्गक्रमण करणे, याला मी अधिक महत्त्व देतो. माझं मन साफ आहे, व्यवहार चांगला आहे, आचरण चांगले आहे, समाजकारण राजकारण स्वच्छ आहे. मी कधीही कुठल्याही गोष्टीच्या मागे वाहवत गेलो नाही. त्यामुळे आजही त्याच उत्साहाने आणि चैतन्याने मी कार्यरत आहे. मी कधीच उपेक्षित राहिलो नाही. कारण, माझं मन साफ आहे आणि हेच माझ्या उत्साहाचे अन् चैतन्याचे कारण आहे.

गेल्या ४३ वर्षांपासून तुम्ही राजकारणात आहेत. १९८० ते २०२३ या चार दशकांहून अधिकचा कालखंड अनेक चढउतारांनी भरलेला आहे. या वाटचालीत ठळकपणे आठवणार्‍या घटना कुठल्या?

१९९० साली मी पहिल्यांदा आमदार झालो. त्यानंतरच्या १९९५ साली झालेल्या दुसर्‍या निवडणुकीत जनतेने मला प्रतिस्पर्धी उमेदवारापेक्षा दुपटीने अधिक मते देऊन विजयी केलं. १९९९ साली माझ्या घडवून आणलेल्या पराभवाचा जनतेचे बदल घेतला आणि २००४ साली मला सव्वा तीन लाख मते देत पुन्हा एकदा विधानसभेत पाठवलं अन् आपली चीड मतपेटीतून व्यक्त केली. जनतेची सेवा करणार्‍या व्यक्तीला जर आपण दुखावलं, तर त्याचे भोग भोगावे लागतात, हे मी प्रकर्षाने नमूद करू इच्छितो. २००९ मध्येही माझा दिमाखदार विजय झाला; पण २०१४ मध्ये झालेल्या पराभवातून मला धडा मिळाला. २०१९ मध्ये मी ‘कमबॅक’ केलं; पण माझ्या राजकीय वाटचालीत मी काम केलेल्या तीनही पक्षातील कुणावरही मी दोषारोप केले नाही. जीवन जगताना आनंद आणि दुःखाचे असे दोन्हीही क्षण येतात, त्यात आपल्या जीवनावर कृत्रिमपणे डाग लावण्याचा प्रयत्नही होतो; पण सत्य कधीही पराभूत होत नाही आणि त्यावर माझा विश्वास आहे. ‘रिलायन्स’ उद्योग समूहाचे संस्थापक स्व. धीरुभाई अंबानी यांचा लाभलेला सहवास आणि त्यांनी माझ्याप्रती व्यक्त केलेल्या भावना मला आयुष्यभर पुरणारी शिदोरी आहे, असं मी मानतो. त्यांच्या कफ परेड भागातील घरी स्व. बाळासाहेब ठाकरे, स्व. प्रमोद महाजन यांच्या समवेत व्यतीत केलेला वेळ माझ्या कायम स्मरणात राहील.

नवी मुंबई आणि गणेश नाईक हे एक घट्ट समीकरण. आज महाराष्ट्रच नाही, तर देशभरात नव्याने निर्माण झालेल्या शहरांच्या यादीत विकसित आणि सर्वार्थाने परिपूर्ण शहर म्हणून नवी मुंबईची ओळख. एकविसाव्या शतकात एका शहरासाठी आवश्यक असलेल्या सगळ्या बाबी तुम्ही नवी मुंबईच्या रचनेत अनेक वर्षांपूर्वी करून ठेवल्या होत्या. या दूरदृष्टीबद्दल काय सांगाल?

१९९५ साली संजीव नाईक पहिल्यांदा नगरसेवक झाले, तेव्हा आमच्या एकूण ३७ नगरसेवकांना प्रतिमहिना पाच हजार वेतन आम्ही द्यायचो. त्या कालखंडात आम्ही सर्वतोपरी जनतेसाठी आणि आपल्या कार्यकर्त्यांसाठी जे करता येईल ते केले. महापालिकेचे पाणीही न पिता लोकांची सेवा करण्याचे काम त्यावेळीही आम्ही केले. इतर शहरांचा प्रशासकीय खर्च ५० टक्क्यांहून अधिक असतो. मात्र, नवी मुंबईचा खर्च केवळ २७ टक्के आहे. त्यामुळे नवी मुंबईला इतर शहरांपेक्षा अधिकचा पैसा जनतेची कामे करण्यासाठी उपयोगी पडतो. २० वर्षं नवी मुंबईकरांना घरपट्टी आणि पाणीपट्टीसाठी कुठलीही वाढीव रक्कम द्यावी लागणार नाही, असे अभिवचन आम्ही २००० साली दिले होते आणि त्याची पूर्ततादेखील केली. आगामी २० वर्षांतही नवी मुंबईकरांना घरपट्टी आणि पाणीपट्टीसाठी कुठलाही अतिरिक्त खर्च करावा लागणार नाही, असे मी जाहीर केलेले आहे अन् त्यासाठी कराव्या लागणार्‍या उपाययोजनादेखील आमच्यासमोर आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात १५ लाख कोटींची ’डाटा सेंटर्स’ उभारण्याची घोषणा केली होती. त्यापैकी पाच लाख कोटींची ’डाटा सेंटर्स’ नवी मुंबई महापालिका क्षेत्रात उभारली जाणार असल्याने त्याचा निश्चितच खूप मोठा परिणाम या शहराच्या वाटचालीवर होणार आहे. नवी मुंबई स्वच्छतेच्या बाबतीत क्रमांक एकवरचे शहर बनले आहे. भयमुक्तता, गुन्हेगारीचे अत्यल्प प्रमाण या शहराच्या सुरक्षिततेची ग्वाही देते. आम्ही शहरात कधीही गुन्हेगारांचे अड्डे निर्माण होऊ दिले नाहीत. या सगळ्यांवर अंकुश आणण्यासाठी आमच्याकडे ‘मॉरल पॉवर’ अर्थ ‘नैतिक शक्ती’ आहे अन् त्या नैतिक शक्तीच्या बळावरच आम्ही नवी मुंबईकरांसाठी काम करीत आहोत.

शहर नव्याने उभारताना काही मूलभूत बाबी उदाहरणार्थ स्वच्छता, संसाधनांची उपलब्धता त्याचा होणारा वापर आणि त्यानुसार त्याचं केलं जाणारं नियोजन, गर्दीची समस्या, पर्यावरण सांभाळून विकासाची धोरणं आखणे, या सगळ्या गोष्टी विचारात घेतल्या जातात आणि या सगळ्या गोष्टी तुलनेनं नवी मुंबईत अधिक ठसठशीतपणे दिसून येतात. त्याचं कारण काय?

गेल्या काही वर्षांमध्ये अनेक मंडळींनी आरामदायी आणि सुखकर आयुष्य जगण्यासाठी नवी मुंबईची निवड केली आहे. शहरांचे सौंदर्य बिघडू नये, यासाठी आम्ही विशेष काळजी घेतली. रस्त्यांवर होणार्‍या अतिक्रमणांवर आम्ही कारवाई केली. अनधिकृत टपर्‍यांना अतिक्रमणातून बाजूला करीत केंद्र सरकारच्या फेरीवाला धोरणात सहभागी करून अधिग्रहित भूखंडावर त्यांची सोय करून द्यावी, अशा सूचना संबंधित अधिकार्‍यांना देण्यात आल्या आहेत. पदपथ चालण्यासाठी अन् रस्ते गाड्यांसाठी त्यामुळे अशा प्रकारे कुठलेही अतिक्रमण होऊ नये, यासाठी आम्ही प्रयत्न केले. इतर शहरांच्या तुलनेत नवी मुंबईत भ्रष्टाचार कमी आहे, याचं श्रेय केवळ भाजपचं नाही; तर नवी मुंबईतील सर्वपक्षीय नेते आणि नगरसेवकांना जातं. अधिकारी आणि नगरसेवक यांच्या प्रामाणिक प्रयत्नांमुळे नवी मुंबई आज सुस्थितीत आहे. विरोधक काहीही आरोप करीत असले, तरी आम्ही अजाणतेपणानेदेखील कुणाच्या भावना विकास करताना दुखावलेल्या नाहीत. पालकमंत्री पदाच्या १५ वर्षांच्या कार्यकाळात कधीही कुणाकडून साधा चहादेखील मी प्यायलो नाही. मी अशाप्रकारे गैरमार्गाचा वापर केला नाही आणि तो नगरसेवक अन् अधिकार्‍यांनीही करू नये ; अन्यथा त्यावर कारवाई करावी लागेल. हा माझा त्यांना इशारा आहे. आजच्या काळात न केलेल्या गोष्टींचे श्रेयही घेतले जाते. परंतु, आम्ही केलेल्या कामाचाही कधी गवगवा केला नाही. पूर्वीच्या काळात राजकारणात काम करणार्‍या मंडळी एकमेकांना चूक करण्यापासून परावृत्त करायच्या. मात्र, आजच्या काळात स्थिती बदलली आहे. शहराचा विकास करताना निसर्गावर विपरित परिणाम होऊ नये, हा विचार ठेवत पर्यावरणीय समतोल राखून काम करण्यावर आम्ही बारकाईने लक्ष दिले. आशिया खंडातील मोठा ‘केमिकल झोन’ असलेला ठाणे-बेलापूर पट्टा आम्ही यापासून बाजूला केला आणि कालांतराने हा ‘केमिकल झोन’ नवी मुंबईपासून दूर गेला. पर्यावरणमंत्री आणि कामगारमंत्री म्हणून काम करताना, कारखाने बंद होऊ नयेत आणि पर्यावरणाचीही काळजी घेतली जावी, अशी दुहेरी जबाबदारी मी एकाच वेळी निभावली. कुठलीही परदेशी यंत्रणा हाताशी न घेता, सन २००० ते २००५ दरम्यान सांडपाणी प्रक्रिया यशस्वीरित्या राबवली अन् शहराला जलप्रदूषणापासून वाचवले. प्रक्रिया केलेल्या पाण्यावर पुनर्प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर नवी मुंबईत औद्योगिक आणि इतर काही कामांसाठी केला जातो. नवी मुंबईत मोठ्या प्रमाणात फ्लेमिंगो पक्षी दरवर्षी येतात आणि नवी मुंबईला ‘फ्लेमिंगोंचे शहर’ म्हणून ओळखलेदेखील जाते. फ्लेमिंगो पक्ष्यांमुळे निर्माण होणारं नैसर्गिक सौंदर्य विकत घेता येत नाही, त्यामुळे या भागात भूखंड आखून त्यावर इमारत बांधण्याचे मनसुबे आम्ही नवी मुंबईकरांनी उधळून लावले. मुंबई आणि नवी मुंबईत अनधिकृत बांधकामे आहेत. पण, वाढत्या लोकसंख्येला सामावून घेण्यासाठी नव्या उपाययोजना करणेदेखील आवश्यक आहे. यासाठी निश्चितच येत्या काळात काही तरी वेगळं काम केलं पाहिजे, अशी आमची धारणा आहे. राज्यकर्त्यांना काम करू न देण्याची जी प्रवृत्ती गेल्या काही वर्षांमध्ये बळावली आहे, ती संपवणे देखील आवश्यक आहे.

गेल्या तीन वर्षांपासून तुम्ही भाजपचे नेते आणि आमदार म्हणून कार्यरत आहात. २०१४ पासून केंद्रात भाजपचे सरकार आहे आणि पुढील वर्षी लोकसभेच्या निवडणुकादेखील आहेत. एकंदरच केंद्रातील मोदी सरकारचं काम आणि येत्या वर्षभरात होणार्‍या निवडणुका यावर ज्येष्ठ राजकीय नेता म्हणून तुमचं आकलन काय आहे?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व संपूर्ण जगाने मान्य केलं आहे. २०१४ साली मोदींनी जनतेला दिलेली आश्वासने आणि त्यासाठी २०१९ पर्यंत पाच वर्षे अव्याहतपणे केलेलं काम याचा परिणाम २०१९ सालच्या लोकसभा निवडणुकीत दिसून आला. २०१४ पेक्षा अधिक भक्कम बहुमताने जनतेने मोदींना निवडून दिले. २०२४ मध्येही अशाच प्रकारच्या यशाची अपेक्षा सर्वसामान्य जनतेला आहे. मोदींना पुन्हा एकदा पंतप्रधान होऊन आपले स्मारक बांधायचे नाही किंवा आपला गवगवा करून घ्यायचा नाही. ते निर्मोही आहेत आणि ते ज्या विचारधारेतून आलेत, तिथे राष्ट्र सर्वतोपरी आहे. आपला देश सर्वांना सोबत घेऊन चालणार असावा, दुबळ्यांना सांभाळून घेणारा असावा, धनधान्याने संपन्न असावा, सर्वशक्तिमान व्हावा, सर्वार्थाने आत्मनिर्भर व्हावा, भारताचा दरारा निर्माण व्हावा आणि सामर्थ्यशाली राष्ट्र म्हणून जगभरात कणखरपणे जगात स्थापित व्हावा, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी अव्याहतपणे काम करीत आहेत. नुकत्याच झालेल्या ‘जी २०’ बैठकीतूनही भारताच्या बदललेल्या प्रतिमेचे दर्शन जगाला झाले आहे. मोदींना पंतप्रधान होण्यासाठी निवडणूक जिंकायची नसून, राष्ट्राला सामर्थ्यशाली बनवण्यासाठी सत्तेवर यायचे आहे.

महाराष्ट्र भाजपचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाला गतिमान करण्यासाठी प्रयत्नशील असून त्याचे प्रतिबिंब राज्य सरकारच्या कारभारातही दिसून येते. त्याविषयी काय सांगाल?

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोन्ही नेते असाधारण कल्पकतेचे धनी आहेत. फडणवीसांसारख्या बुद्धिमान आणि कार्यक्षम व्यक्तीवर जातीचा शिक्का मारून त्यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जातो. अशा प्रकारे जातीच्या नावावर कुणाची कोंडी करणे, हे देशाच्या प्रगतीला खीळ बसवण्यासारखे आहे. जातीयवाद करणार्‍या आखूड विचारांची मंडळी कधीही मोठी होऊ शकत नाहीत. मी गेल्या काही वर्षांपासून त्यांच्यासोबत करताना त्यांच्या शांत, संयमी, विवेकाने मार्गक्रमण करणारा सर्वसमावेशकतेचे तत्त्व अंगीकारून ध्येयपूर्तीसाठी काम करणारा नेता म्हणून फडणवीसांची प्रतिमा माझ्या मनात आहे.

भविष्यकाळात होणारा नवी मुंबईचा सामाजिक, राजकीय आणि आर्थिक स्वरुपाच्या दृष्टीने होणारा विस्तार, याकडे तुम्ही कसे पाहता?

सर्वसामान्य जनतेने मला आजवर भरपूर प्रेम आणि विश्वास दिला. त्यांचं नेतृत्व दिलं म्हणून नवी मुंबईसाठी मी काही तरी करू शकलो. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंशी भेटून नवी मुंबईच्या १५ ते २० प्रश्नांविषयी मी चर्चा केली. त्यात महापालिकेला ’सिडको’च्यावतीने मिळणारे भूखंड अन् त्याचा योग्य वापर, ’एमआयडीसी’कडून देण्यात येणारे भूखंड, महत्त्वाच्या ठिकाणी झालेली अतिक्रमणे व त्यातून होणार्‍या दुर्घटना, यावर कारवाईची केलेली मागणी, विक्रोळी ते कोपरखैरणे दरम्यान एक पूल बांधावा, घणसोलीपर्यंत सीमित ठेवण्यात आलेला पामबीच रोड ऐरोलीपर्यंत न्यावा, अशा काही मागण्या मी मुख्यमंत्र्यांकडे केल्या आहेत. लोकशाही पद्धतीने आंदोलने करून ’गतिमान नवी मुंबई’साठी शक्य त्या सर्व गोष्टी आणण्यासाठी आम्ही कायम प्रयत्नशील असणार आहोत.


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

ओम देशमुख

मूळ मराठवाड्यातील बीडचे.
'बॅचलर ऑफ जर्नालिझम'पर्यंत शिक्षण.
सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये पदविकेपर्यंतचे शिक्षण पूर्ण.
सध्या दै.'मुंबई तरुण भारत'चे मुंबई महापालिका प्रतिनिधी.
दै.'मुंबई तरुण भारत'पूर्वी काही वृत्तपत्र आणि पोर्टल्ससाठी लिखाण.