रडतराऊंची पिचकी पिपाणी!

    12-Sep-2023
Total Views |
Editorial On Uddhav Thackeray says Godhra-like incident can happen

केवळ दोन जागांवरून केंद्रात स्वबळावर दोनदा सरकार बनविण्यापर्यंत देदीप्यमान कामगिरी करणार्‍या भाजपला आगामी लोकसभा निवडणुकीत विजयासाठी घातपाताचा बनाव रचण्याची गरज नाही. पण, लायकी नसतानाही मिळालेली सत्ता, स्वार्थासाठी उपभोगण्याइतकी समज असलेले नेतेच निवडणुकीतील विजयाला वारेमाप महत्त्व देत असतात. लोकांमध्ये आपण विनोदाचा विषय बनलो आहोत, याची जाणीव नसलेले मरतुकडे नेते, त्यातून आपल्या पराभूत आणि वैफल्यग्रस्त मनोवृत्तीचे दर्शन घडवीत आहेत.

पुढील वर्षीच्या प्रारंभी अयोध्येतील भव्य राम मंदिराच्या उद्घाटनाच्या वेळी देशात पुन्हा एकदा गोध्रा जळीतकांडासारखी घटना घडवून आणली जाईल आणि त्यामुळे समाजात असंतोष माजवून जातीय दंगली घडविल्या जातील आणि त्याद्वारे देशातील मतदारांचे ध्रुवीकरण करून भाजप पुन्हा सत्तेवर येईल, अशा प्रकारचे वक्तव्य उरल्यासुरल्या शिवसेनेच्या एका छोट्या गटाचे प्रमुख असलेले उद्धव ठाकरे यांनी केले. त्यांचे हे वक्तव्य म्हणजे ठाकरे हे नैराश्याला बळी पडत चालल्याचे लक्षण आहे. गेले काही दिवस ते करीत असलेली राजकीय वक्तव्ये ही खरं तर त्यांचा मानसिक तोल ढासळत असल्याचे संकेत देत आहेत.

उद्धव ठाकरे यांनी राम मंदिराच्या उद्घाटनासंदर्भात केलेला आरोप गंभीर असला, तरी त्यातून त्यांनी आपल्या पराभूत मनोवृत्तीची कबुली दिली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपचा विजय होईल आणि राम मंदिराचे उद्घाटन, हे त्यातील एक महत्त्वाचे कारण असेल, याची त्यांना मनोमन खात्री पटली आहे. म्हणून या घटनेला अपशकुन करण्यासाठी त्यांनी हा कसलाही आधार नसलेला आरोप केला आहे. त्यांच्याकडे अशा घातपाताची माहिती असेल, तर त्यांनी ती देशाच्या सुरक्षा यंत्रणेला दिली पाहिजे. पण, या आरोपाचा आधार हा भाजपद्वेष आहे, सत्य नव्हे. घरभेद्यांच्या संगतीत राहून उद्धव ठाकरे यांना त्यांचा वाण लागला आहे, असे दिसते.आपल्या विजयाची खात्री नसली की, मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा केंद्राचा डाव आहे, अशी एक आरोळी ठोकायची आणि भावनिक आवाहन करून मतदारांची सहानुभूती मिळवायची, इतकीच उद्धव ठाकरे यांचे कर्तबगारी होती. पण, आता हा हातखंडाही उपयोगी पडत नसल्याचे दिसून आल्यामुळे कमालीच्या वैफल्याने त्यांना ग्रासले आहे, हेच त्यांच्या या ताज्या वक्तव्यावरून दिसून येते.

देशभरातून केवळ दोन जागांवर मिळालेला विजय नव्हे, इतका दारूण पराभव पचविण्याची क्षमता असलेले भाजपचे नेतृत्व कसेही करून सत्ता मिळविण्यासाठी लोकांच्या जीवाशी खेळेल, अशी कल्पना केवळ विकृत मनोवृत्तीचे लोकच करू शकतात. निवडणुका या जिंकण्यासाठीच लढायच्या असतात; पण त्यात विजय मिळाला नाही, तर त्यामुळे आपल्या मनाचा तोल ढासळू द्यायचा नसतो, इतकी परिपक्वता भाजपच्या नेतृत्वामध्ये आहे. कोणतेही सबळ कारण नसतानाही भाजपला काही राज्यांमध्ये पराभव पत्करावा लागला होता. पण, त्याबद्दल त्यांनी कधी मतदारांना दोष दिला नाही. त्यांनी पुनश्च हरिओम करीत जनतेत काम करण्याचे आपले धोरण कायम राखले आणि त्यामुळेच दोन जागांवरून केंद्रात स्वबळावर सलग दोनदा सरकार स्थापन करण्यापर्यंत देदीप्यमान कामगिरी करून दाखविली.

आताही आगामी लोकसभा निवडणुकीत आपण विजयाची ‘हॅटट्रिक’ करणार असल्याची खात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे. हा आत्मविश्वास सत्तेतून आलेल्या अहंकारामुळे नसून, आपल्या सरकारच्या लोकाभिमुख धोरणामुळे आणि सरकारने केलेल्या कामामुळे त्यांना आला आहे. दोन वर्षांपूर्वी उत्तर प्रदेशात मिळालेल्या दणदणीत विजयानंतर दिल्लीत पक्षाच्या मुख्यालयात बोलतानाही मोदी यांनी या विजयामुळे हुरळून जाण्याचे कारण नसून, लोकसेवेचे व्रत सुरू ठेवण्याचा सल्ला कार्यकर्त्यांना दिला होता.

लायकी नसताना मिळालेल्या सत्तेमुळे उद्धव ठाकरे यांची स्वत:बद्दल भ्रामक आणि अवास्तव समजूत झाली आहे. ते अन्य नेत्यांनाही स्वत:च्या (अ)नैतिक मूल्यांवरूनच जोखतात, असे दिसते. महाभारतातील विराट राजाचा पुत्र उत्तर एरवी अंत:पुरातील बायकांमध्ये आपल्या नसलेल्या शौर्याच्या बढाया मारीत असे. पण, प्रत्यक्ष रणभूमीवर पसरलेली कौरवसेना जेव्हा तो पाहतो, तेव्हा त्याची भीतीने बोबडी वळते. पण, त्याचा सारथी बनलेला अर्जुन त्याच्यावतीने युद्ध लढून त्यात विजयी होतो. उद्धव ठाकरे यांची अवस्था या राजपुत्र उत्तरसारखी झाली आहे. आपल्या खुशमस्कर्‍यांच्या गराड्यातून बाहेर येऊन उद्धव ठाकरे यांनी वास्तवाचा स्वीकार करण्याची हिंमत बाळगली, तर आपल्या नेतृत्वाबद्दलच्या त्यांच्या सार्‍या कल्पना जळून भस्म होतील.

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी उद्धव ठाकरे यांच्यासारखा नेता कोण आहे, याची चौकशी केल्याच्या आचरट कथा सांगणार्‍या संजय राऊत यांच्यासारख्या गणंगाच्या प्रभावाखाली राहणारे उद्धव ठाकरे हे स्वत:च किती बालिश आणि मूर्ख आहेत, त्याची कल्पना महाराष्ट्रातील जनतेला आली आहे. परंतु, आपण लोकांच्या चेष्टेचा विषय बनलो आहोत, याची त्यांना अजूनही जाणीव झालेली नाही. म्हणूनच माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उत्तुंग कर्तृत्त्वाची कणभरही सर नसताना फडणवीस यांच्यावर बेताल आणि अश्लाघ्य भाषेत टीका करताना आपली किती मानसिक घसरण झाली आहे, ते त्यांना समजत नाही.

फडणवीस यांच्या शारीरिक ठेवणीवरून टीका करणे किंवा त्यांच्या आडनावाचा विपर्यास कऱणे, यांसारख्या बालिश लीलांनी आता करमणूकही होत नाही. अर्थात, उद्धव ठाकरे यांच्याकडून शालीन आणि सुसंस्कृततेची अपेक्षा करणे म्हणजे विस्तवाकडून शीतलतेची अपेक्षा करण्यासारखेच आहे. पण, उद्धव ठाकरे या रडतराऊंच्या पिचक्या पिपाणीचे भेसूर सूर आता बंद करण्याची गरज आहे. म्हातारी मेल्याचे दु:ख नसले, तरी काळ सोकावत असल्याने त्यांच्या वक्तव्यावर कारवाई करण्याची वेळ आता आली आहे.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.