मुंबई : ''उद्धव ठाकरे यांचे मानसिक संतुलन ढासळू लागले असून ते आता राजकारणाच्या मर्यादा देखील पाळू शकत नाहीत. त्यांची भाषा राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडविणारी आहे. यापूर्वीही त्यांना याबाबत सूचित केले आहे. मात्र वारंवार त्यांची भाषा वाईट होत चालली. ठाकरे भाजप नेत्यांवर पातळी सोडून करत असलेल्या टीकेमुळे भाजपचे कार्यकर्ते त्यांचा संयम कधी सोडतील हे सांगता येत नाही,'' असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे. ते सोमवारी नागपूर येथे माध्यमांशी बोलत होते.
उबाठा गटाचे गटप्रमुख उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात गेल्या वर्षभरापासून वाक्युद्ध रंगले आहे. शिवसेनेत झालेल्या बंडाळीनंतर उद्धव यांनी देवेंद्र फडणवीसांवर व्यक्तिगत टीका करायला सुरुवात केली असून त्यात अनेकदा ठाकरेंना भाषेच्या मर्यादेचेही भान राहिलेले नाही हे वारंवार दिसून आलेले आहे.
नुकतेच जळगांव येथील सभेत बोलताना ठाकरेंनी फडणवीसांवर केलेल्या टीकेमुळे महाराष्ट्र भाजपने उद्धव यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत भाजप विरुद्ध उबाठा हा संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्ह निर्माण झाली आहे. बावनकुळे म्हणाले की,''राज्यात शांतता काय राहिली पाहिजे अशी आमची इच्छा आहे. परंतु, राज्यातील कायदा सुव्यवस्था बाधित करायची असं ठाकरेंनी ठरवलं आहे. त्यामुळेच ते अशाप्रकारची विधाने करत आहेत. कुणबी आणि मराठा हे दोन्ही घटक राज्यात भावासारखे राहतात. त्यामुळे विनाकारण कुणबी आणि मराठा यात वाद निर्माण करणे योग्य नाही. या दोन्ही समाजाबाबत राज्य सरकार योग्य तो निर्णय घेईलच,'' असेही बावनकुळेंनी यावेळी म्हटले आहे.
तसेच ''उद्धव ठाकरे आणि नाना पटोले यांना केवळ राजकीय आरोप करायचे असून त्यांना विकासावर काहीही बोलायचे नाही हे स्पष्ट आहे. जनतेत संभ्रम निर्माण करणाऱ्या काँग्रेसला जनता येत्या निवडणुकीत धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही,'' असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.