नवी दिल्ली : नूह हिंसाचारात आतापर्यंत सरकारने केलेल्या कारवाईत ६०० हून अधिक बेकायदा बांधकामांवर बुलडोझर चालविण्यात आला असून सुमारे १०४ एफआयआर नोंदविण्यात आले आहेत. तसेच, या हिंसाचाराप्रकरणी २१६ जणांना अटक करण्यात आली असून आतापर्यंत ८३ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान, गृहमंत्री
अनिल विज यांनी सांगितले की, हा हिंसाचार पूर्वनियोजित असून एक मोठे षडयंत्र असल्याची शक्यता त्यांनी वर्तविली आहे.
दरम्यान, या हिंसाचार सहभागी असणाऱ्या आरोपींच्या घरांवर बुलडोझर चालविण्यात आला असून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई सरकारकडून केली जात आहे. तसेच, हरियाणा सरकारच्या कारवाईवर विहिंपकडून मात्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. त्यांचे म्हणणे आहे की, मेवात हे मिनी पाकिस्तान झाले असून जिहाद्यांवर अशी कारवाई केली पाहिजे की त्यांच्या १० पिढ्यांनीही हिंदू यात्रेकरूंवर हल्ले होऊ नयेत हे लक्षात ठेवावे. असे विहिंपची भूमिका आहे.
दरम्यान, नूह येथील हिंसाचारातील हल्लेखोरांना शिक्षा झालीच पाहिजे. संपूर्ण मेवातमध्ये दहशतीचे वातावरण आहे, म्हणूनच याला मिनी पाकिस्तान म्हणतात. या हल्लेखोरांनी भारतात राहून पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा दिल्या, असे तपासात निष्पन्न झाले आहे.
दुसरीकडे, हरियाणाचे गृहमंत्री अनिल विज यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले आहे की, “हिंसाचारासाठी ज्या प्रकारचे नियोजन केले गेले व ज्या पद्धतीने धरपकड करण्यात आली. त्यानुसार मंदिराच्या वर एका डोंगरावर मोर्चे बांधले गेले. तसेच, प्रवेशाच्या ठिकाणी मोर्चे काढण्यात आले असून हे सर्व नियोजनाशिवाय होऊ शकत नाही", असेही गृहमंत्री अनिल विज यांनी सांगितले. तसेच, यातील प्रत्येकाच्या हातात काठी, शस्त्र होती, या काठ्या मोफत वाटल्या जात नसून याची व्यवस्था करण्यात आली, असा अंदाज गृहमंत्री विज यांनी व्यक्त केला. त्यामुळे हे सर्व पूर्वनियोजित असून हा एका मोठ्या षडयंत्राचा भाग आहे. हरियाणा सरकार तपासाद्नारे या सर्वाच्या खोलात जात आहे, असे विज यांनी यावेळी स्पष्ट केले.