नूहमधील हिंसाचार पूर्वनियोजित : हरियाणा गृहमंत्री अनिल विज

    05-Aug-2023
Total Views |
Hariyana Home Minister Anil Vij

नवी दिल्ली :
राज्यातील नूह येथे झालेला हिंसाचार हा पूर्वनियोजित होता. त्यामुळे या हिंसाचाराच षडयंत्र रचणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा हरियाणाचे गृहमंत्री अनिल विज यांनी दिला आहे. हरियाणातील नूह येथे हिंदूंच्या शोभायात्रेवर हल्ला करण्यात आला होता. त्यानंतर याप्रकरणी आतापर्यंत १०० हून अधिक एफआयआर दाखल करण्यात आल्या आहेत. हरियाणा पोलिस याप्रकरणी सखोल तपास करत असून हरियाणाचे गृहमंत्री अनिल विज यांनी हा हल्ला पूर्वनियोजित असल्याचे वक्तव्य केले आहे.

गृहमंत्री विज म्हणाले की, नूह हिंसाचाराच्या संदर्भात आतापर्यंत १०२ एफआयआर नोंदवले गेले आहेत, त्यापैकी निम्म्याहून अधिक एकट्या नूहमध्ये आहेत. हल्लेखोर हाती शस्त्रे घेऊन मंदिराच्या शेजारी असलेल्या टेकड्यांवर लपले होते. त्यानंतर त्यांनी मंदिराचे प्रवेशद्वार बंद करून ठेवले होते. हे सर्व नियोजनाशिवाय शक्य नाही. गोळ्या झाडण्यात आल्या, जाळपोळ झाली आणि काही लोकांनी शस्त्रांचीही व्यवस्था केली होती, हे एकाएकी घडलेले नाही. याप्रकरणाचा सखोल तपास केला जाणार असून त्याशिवाय ठोस निष्कर्ष काढता येणार नाही, असेही विज म्हणाले आहेत.

दरम्यान, याप्रकरणी दि. ५ ऑगस्ट रोजी सात एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. नूह येथील जातीय हिंसाचारानंतर जिल्हा प्रशासनाने रोहिंग्यांच्या बेकायदेशीर वस्त्यांवर बुलडोझर चालवला असून २५० हून अधिक झोपड्या पाडण्यात आल्या आहेत.