ठाणे : भाजप ठाणे शहर उपाध्यक्ष म्हणून कार्यरत असलेले सुजय पत्की यांची भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते पदी नियुक्ती केली. त्याचबरोबर फ्रेंड्स ऑफ बीजेपी या विभागाचे प्रदेश सहसंयोजक पदाची जबाबदारी देखील त्यांच्यावर सोपविली. यावेळी माजी खासदार डॉ. विनय सहस्रबुद्धे, प्रदेश सरचिटणीस माधवी नाईक व सरचिटणीस विक्रांत पाटील उपस्थित होते.
ठाणे भाजपामधील एक अभ्यासू चेहरा म्हणून सुजय पतकी यांनी आपली ओळख निर्माण केली आहे. पक्षात कार्यरत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस, केंद्र व राज्य सरकार तसेच पक्षाच्या भूमिका विविध वर्तमानपत्रांमध्ये, माध्यमे, समाजमाध्यमे यातून ते मांडत आहेत. दहा हजार महिलांना मल्टीविटामिन गोळ्यांचे वाटप, बारा हजार विद्यार्थ्यांना पोषक आहार वाटप हे विशेष कार्यक्रम आयोजित केले होते. सांस्कृतिक तसेच राजकीय सामाजिक घडामोडींवर कार्यक्रम व चर्चासत्रे सुजय पतकी सातत्याने ठाणे शहरामध्ये आयोजित करत असतात. नुकतेच समान नागरी कायदा कशासाठी आणि कसा या चर्चासत्राचे आयोजन त्यांनी केले होते.
अस्सल राष्ट्रवाद, सर्वसमावेशक विकास ह्या तत्वांवर श्रद्धा बाळगत, अंत्योदयाचे स्वप्न हे फक्त भारतीय जनता पक्षाचे ध्येय नाही तर आपल्या सर्वांचे ध्येय मानणाऱ्या भारतीयांना एका व्यासपीठावर आणण्याचे काम 'फ्रेंड्स ऑफ बीजेपी' करीत आहे. या विभागाची महाराष्ट्र प्रदेश सहसंयोजक म्हणून देखील जबाबदारी सुजय पतकी यांच्याकडे देण्यात आली आहे.
अंत्योदयाच्या भूमिकेतून भारतीय जनता पक्ष कार्यरत आहे. या कार्यात आपला सहभाग देता येणे, ही वैयक्तिक आनंदाची बाब आहे. देवेंद्रजी फडणवीस व प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी माझ्यावर विश्वास दाखवून मला जबाबदारी दिल्याबद्द्ल त्यांचा आभारी आहे. पक्षाच्या अपेक्षांना न्याय देण्यासाठी मी कटिबद्ध आहे.
- सुजय पत्की