राष्ट्रासह जागतिक कल्याणाचे ध्येय

    29-May-2023   
Total Views |
global well being with nation

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला आता नऊ वर्षे पूर्ण झाली आहेत. पुढील वर्षाच्या मे महिन्यात दहा वर्षे पूर्ण करून लोकसभा निवडणुकीस हे सरकार सामोरे जाईल. त्यामुळे आता हे अखेरचे वर्ष अतिशय धामधुमीचे असणार, हे नक्की. मात्र, या नऊ वर्षांमध्ये मोदी सरकारने केवळ देशातच नाही, तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही अनेक दूरगामी बदल घडविले आहेत, हे अजिबात नाकारता येणार नाही.

धोरणलकवाग्रस्त सरकार, पंतप्रधानांची होणारी अवहेलना, मंत्रिमंडळावर अंकुश ठेवणारी सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखालील सरकारबाह्य व्यवस्था, अर्थव्यवस्थेची डळमळीत अवस्था, आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतास नसणारे महत्त्व अशा सर्व नकारात्मक वातावरणाच्या पार्श्वभूमीवर २०१४ साली ऐतिहासिक सत्तांतर झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापुढे या सर्व नकारात्मकतेवरून मार्ग काढून पुढे जाण्याचे आव्हानही होते. आता २०२३ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाली आहेत. ही नऊ वर्षे सर्वसमावेशक, प्रगतीशील आणि शाश्वत विकास घडवून आणण्यासाठी समर्पित आहेत.

पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील सरकार आपल्या सर्व नागरिकांसाठी समानता आणि संधी निर्माण करण्याच्या आपल्या वचनबद्धतेवर ठाम राहिले आहे. पंतप्रधान मोदींनी विकासाच्या राजकारणाला म्हणजेच विकासाला केंद्रबिंदू बनवून मुख्य प्रवाहात आणले आणि आता राजकीय संवाद आणि धोरणात्मक कार्यप्रक्रिया याच्याभोवती फिरत आहे. २०१४ मध्ये पदभार स्वीकारल्यापासून पंतप्रधान मोदी प्रत्येक धोरणनिर्मिती आणि अंमलबजावणीमध्ये ’इंडिया फर्स्ट’ची संकल्पना मांडण्याच्या त्यांच्या संकल्पावर ठाम आहेत. बाह्य आणि अंतर्गत सुरक्षा, आर्थिक व्यवस्थापन, उपेक्षित गटांसाठी सक्षमीकरण योजना, सांस्कृतिक जतनाचे प्रयत्न इत्यादींवर उपाय शोधण्याच्या सरकारच्या प्रयत्नांमध्ये हा निर्धार स्पष्टपणे दिसून येतो.

मोदी सरकारने नेहमीच आव्हानात्मक उद्दिष्टे निश्चित करण्यात आणि निर्धारित कालावधीपूर्वी ती साध्य करण्यावर विश्वास ठेवला. हा निर्धार विक्रमी वेळेत कोरोना विरूद्ध संपूर्ण पात्र लोकसंख्येचे लसीकरण करणे, देशाच्या इतिहासातील आतापर्यंतची सर्वाधिक निर्यात नोंदवणे, संपूर्ण भारतात ‘डिजिटल’ क्रांती घडवणे, ग्रामीण भागाचे विद्युतीकरण करणे, जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांची उभारणी असो किंवा घरांना पिण्याच्या पाण्याची सुविधा पुरवणे असो, अशी आजपर्यंत अशक्यप्राय वाटणारी उद्दिष्टे साध्य करण्यास यश आले आहे. गेल्या नऊ वर्षांत, जन-धन, आधार आणि मोबाईलच्या रूपात ‘जेएएम’ असा या त्रिशक्तीचा वापर करून सार्वजनिक सेवा वितरण आणि सरकारी योजनांच्या अंमलबजावणीमध्ये एक आदर्श बदल घडवून आणला गेला. ही त्रिशक्ती हे भारताच्या बदललेल्या आणि सु-विकसित ‘डिजिटल’ व्यवस्थेचे आदर्श उदाहरण. यामुळे मध्यस्थांची व्यवस्थाच उद्ध्वस्त झाली असून लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरित करण्याची सुविधा निर्माण झाली आहे.

देशाच्या प्रगतीसाठी पायाभूत सुविधांचा झपाट्याने विकास होणे आवश्यक आहे आणि पंतप्रधान मोदींच्या गतिमान नेतृत्वाखालील सरकारने हे वास्तव अधिक चांगल्या प्रकारे समजून घेतले. अनेक दशकांपासून विलंबित प्रकल्पांची पूर्तता तसेच नवीन प्रकल्प सुरू करणे, हा या सरकारच्या विकासात्मक दृष्टिकोनाचा पाया आहे. भूतकाळातील विकासाच्या दिशाहीन दृष्टिकोनाच्या विपरित, मोदी सरकारने सर्वांगीण विकासाची संस्कृती स्वीकारली आहे. ज्यामध्ये सर्वसमावेशकता हा केंद्रबिंदू आहे. गेल्या नऊ वर्षांत कल्याणकारी योजनांच्या विस्ताराने सर्व भारतीयांना मोठी स्वप्ने पाहण्यास प्रोत्साहन तर दिले आहेच, परंतु त्याचवेळी त्यांच्या वाढत्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी पुरेसा सरकारी पाठिंबाही दिला आहे, जेणेकरून प्रत्येक भारतीय ’अमृतकाळा’मधील भारताच्या विकासगाथेचा भाग बनण्याची संधी मिळेल. जो विकास शाश्वत नाही, तो खरा विकास नाही, हे आता जगाला कळू लागले आहे.

हे प्राचीन भारतीय तत्त्वज्ञानाशी सुसंगत आहे, ज्याने नेहमीच निसर्ग आणि पर्यावरणाला महत्त्व दिले. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भारताने पर्यावरण रक्षणाला जागतिक स्तरावर पाठिंबा दिला आहे आणि आपला देश या चळवळीचा प्रमुख मार्गदर्शक म्हणून पुढे आला आहे. पर्यावरणाप्रमाणेच पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भारत आपल्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी कटिबद्ध आहे. ’नेबरहूड फर्स्ट’ धोरणांतर्गत भारताच्या परराष्ट्र धोरणाचे प्राथमिक लक्ष त्याच्या निकटवर्तीयांवर आहे. हे ’अ‍ॅक्ट ईस्ट’, ’थिंक वेस्ट’ आणि ’कनेक्ट सेंट्रल एशिया’ धोरणांद्वारे सशक्त झाले आहे. याद्वारे विस्तारित शेजार्‍यांसोबतही भारताचे संबंध दृढ होत आहेत. त्यासह हिंद-प्रशांत महासागर क्षेत्रामध्ये भारत आज एक प्रमुख शक्ती म्हणून उदयास आला आहे. चीन आणि पाकिस्तानसोबतच्या संबंधांमध्ये भारताने अतिशय कठोर धोरण स्वीकारले आहे.

प्रामुख्याने चीनला भारताने दिलेल्या प्रत्युत्तरामुळे जगातील अन्य देशांनीही चीनच्या अरेरावीस झुगारून देण्यास प्रारंभ केला आहे. त्याचवेळी देशांतर्गत संरक्षण उपकरणांच्या उत्पादनात आणि त्यांची निर्यात करण्यातही भारताने जगात प्रमुख स्थान पटकावले आहे. त्याचप्रमाणे जागतिक संघर्षांमध्येही आज भारताच्या भूमिकेस महत्त्व प्राप्त झाले आहे. सध्या सुरू असलेल्या युक्रेन संघर्षामध्ये दोन्ही संघर्षग्रस्त देशांसाठी तर भारताची भूमिका महत्त्वाची आहेच. मात्र, हा संघर्ष संपवू पाहणार्‍या आंतरराष्ट्रीय संस्थांसह देशांसाठीदेखील भारताची भूमिका अतिशय महत्त्वाची ठरत आहे. एकूणच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नऊ वर्षांच्या कारकिर्दीमध्ये ‘राष्ट्र प्रथम’, राष्ट्रीय सुरक्षा, संरक्षण, राष्ट्रवाद, भारतीय संस्कृती -वारसा-परंपरा, हिंदुत्व, उद्योग, पायाभूत सुविधा, आरोग्य, आंतरराष्ट्रीय संबंध या आणि अशा अनेक मुद्द्यांमध्ये उल्लेखनीय यश प्राप्त झाले आहे, हे मान्य करावेच लागेल.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.