वसा दुर्लक्षित प्रजातींच्या संवर्धनाचा

    01-May-2023   
Total Views |tata power


विलक्षण जैवविविधता आढळणार्‍या जगातील सर्वात मोठ्या ठिकाणांपैकी एक ठिकाण म्हणजे पश्चिम घाट. ’युनेस्को’चा जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळालेल्या पश्चिम घाटाच्या संवर्धनाचा वसा ‘टाटा पॉवर’ कंपनीने उचलला आहे. गेली 100 वर्ष ही कंपनी पश्चिम घाटाच्या कुशीत वन आणि वन्यजीवांच्या अनुषंगाने विविध संवर्धन प्रकल्प राबवित आहे. या प्रदेशातील सर्वात लक्षणीय आणि प्रदेशनिष्ठ वनस्पती व प्राणी यांचे संरक्षण व संवर्धनाचे काम करत आहे. महाराष्ट्राच्या पश्चिम घाटांमधील हरित आवरणामध्ये वाढ केली जावी, वातावरणातील बदलांचा मुकाबला केला जावा, जैवविविधतेला पाठिंबा दिला जावा आणि पर्यावरणानुकूल विकासाला प्रोत्साहन मिळावे, यासाठी ‘टाटा पॉवर’ने निरनिराळे उपक्रम राबवले आहेत.


दोन महिन्यांपूर्वी दि.21 मार्च रोजी आपण आंतरराष्ट्रीय वन दिवस साजरा केला. वन संवर्धनाविषयी जागरुकता निर्माण करून जगभरातील राष्ट्रांना यासंदर्भात प्रोत्साहन देण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेने ‘वन दिवस’ घोषित केला आहे. याअंतर्गत यंदा ’वन व आरोग्य’ ही संकल्पना राबवून वन संवर्धनाचे काम वर्षभर करण्याचे आवाहन संयुक्त राष्ट्रसंघाने केले आहे. पर्यावरणाविषयी बांधिलकी आणि सर्वमावेशकधोरणांसह ’टाटा पॉवर’ पश्चिम घाटांमधील जैवविविधतेच्या संवर्धनासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. यामध्येसहा तलाव आणि हायड्रो स्टेशन्समधील जवळपास 36 हजार एकर जमिनीचा समावेश आहे. या प्रदेशाचे संरक्षण करण्याबरोबरच कंपनीने ’ईला फाऊंडेशन’ या पर्यावरण शिक्षण व संवर्धनासाठी कार्य करणार्‍या स्वयंसेवी संस्थेच्या सहकार्याने महाराष्ट्राच्या उत्तर पश्चिम घाटांमधील विविध प्रदेशनिष्ठ पक्षी, सरपटणारे प्राणी आणि उभयचरांचे यशस्वीपणे दस्तावेजीकरण केले आहे.


1979 सालापासून गेली पाच दशके ’टाटा पॉवर’ने वृक्ष लागवडीचा उपक्रम मोठ्या प्रमाणावर राबवला आहे. 1970च्या दशकात कंपनीने ’महाशीर’ या संकटग्रस्त माशाच्या संवर्धनाची सुरुवात केली. या माशाची संख्या कमी झाल्यावर मत्स्य विभागाने कंपनीला या माशांच्या संवर्धनासाठी काही करता येईल का, अशी विचारणा केली. कंपनीनेही पुढाकार घेतला. ’महाशीर’ला वाचविण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. अभ्यासकांनी पहिल्यांदा माशांचा सखोल अभ्यास केला, कारणे जाणून घेतली. लोणावळा येथील वळवण धरण प्रकल्पाजवळ केंद्रीय मत्स्य शिक्षण संस्थेच्या सहयोगाने ‘महाशीर प्रजनन केंद्र’ स्थापन करण्यात आले. निळे कल्ले असलेला आणि सर्वाधिक लक्षणीय सोनेरी अशा ’महाशीर’च्या दोन्ही प्रजातींवर लक्ष केंद्रित करायचे ठरले. यासाठी एकाच वेळी चार ते पाच लाख महाशीर अंडी उबवण्याची कल्पक पद्धत विकसित केली गेली. बघता बघता यश आले. आज, केंद्रात जन्माला आलेले महाशीर झरे, नद्यांमध्ये सोडण्यासाठी देशभरातील विविध मत्स्य विभागांकडे सोपवले जातात. आत्तापर्यंत कोट्यवधी माशांचे या केंद्रात प्रजनन झाले आहे, अशी माहिती ‘टाटा पॉवर’ कंपनीच्या जैवविविधता विभागाचे प्रमुख डॉ. विवेक विश्वासराव देतात. निळ्या कल्ल्यांचा महाशीर आता संकटग्रस्त यादीतून बाहेर पडला आहे. सोनेरी महाशीरही लवकर बाहेर पडेल, असा विश्वास विश्वासराव व्यक्त करतात.
tata power‘महाशीर’ माशाच्या संवर्धनाबरोबर कंपनीने वृक्षारोपण देखील केले. पश्चिम घाटातील हरित आवरण वाढवले जावे, प्रदेशनिष्ठ वनस्पती आणि प्राणीजीवनाचे संरक्षण व्हावे हा या मागचा उद्देश होता. त्याबरोबरीनेच जमिनीची धूप रोखली जावी, स्थानिक गावकर्‍यांसाठी रोजगार संधी निर्माण केल्या जाव्यात, शैक्षणिक व संशोधन कार्यासाठी माहिती जमा केली जावी हादेखील कंपनीचा उद्देश आहे. गेल्यावर्षी कंपनीने वनीकरणावर लक्ष केंद्रित करण्याच्या प्रयत्नांमध्ये वाढ केली. पश्चिम घाटांमध्ये ‘टाटा पॉवर’ने एक दशलक्षपेक्षा जास्त झाडे लावली आहेत. आजदेखील या उपक्रमामध्ये वेगाने वाढणार्‍या झाडांच्या प्रजातींवर जास्त भर दिला जातो. गावकर्‍यांना इंधनासाठी पुरेसे लाकूड मिळावे, हा यामागचा उद्देश आहे. स्थानिकांना उपयोग व्हावा, यासाठी फळझाडे, औषधी वनस्पती जास्त प्रमाणात वाढवल्या जातात. मधमाशांना पुरेसा मध मिळेल व पक्ष्यांना घरटी बांधता येतील, अंडी घालता येतील अशी झाडे आवर्जून लावली जातात. करंज (पोंगामिया पिनाटा), आपटा (बौहीनिया रेसमोस), शिवन (जमेलीना अर्बोरिया), बेहेडा (टर्मिनलिया बेलिरिका), धमान (ग्रीविया तिलिफोलिया) आणि इतर प्रजातींची निवड वनीकरण उपक्रमामध्ये विचारपूर्वक करण्यात आली आहे. झाडे लावण्याच्या कामांमध्ये तसेच वन्य प्राण्यांना संरक्षण पुरवण्यात वन विभागाला ‘टाटा पॉवर’ कंपनी सक्रिय सहकार्य करत असते. आजवर ‘टाटा पॉवर’ने सांबर, जंगली डुक्कर, उदमांजर, खवले मांजर आणि इतर अनेक छोटे पक्षी, सरपटणारे प्राणी यांची सुटका करून त्यांना नैसर्गिक अधिवासात सोडले आहे.


संवर्धन प्रयत्नांबरोबर ‘ट्री मित्र’ या उपक्रमाच्या माध्यमातून ‘टाटा पॉवर’ने आपले कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी एक झाड दत्तक घेण्यासाठी प्रोत्साहन दिले आहे. हे झाड लावून त्याला वाढवण्याचे, त्याचे संरक्षण करण्याचे कामदेखील कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय करतात. अनेक दशके सुरू असलेल्या या उपक्रमामुळे महाराष्ट्र, झारखंड, उत्तर प्रदेश, ओडिशा, गुजरात आणि कर्नाटक या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्यात आले आहे. ’बायोडायर्व्हसिटी सीरिज’ आणि ’अकाउंट ऑफ नेचर’ याचा एक भाग म्हणून टाटा पॉवरने ‘ईला फाऊंडेशन’च्या सहकार्याने पक्षी आणि प्राण्यांचे दस्तावेजीकरण केले आहे.


’बर्ड्स ऑफ लोणावळा अ‍ॅण्ड खंडाळा’ या पुस्तकामध्ये लोणावळा व खंडाळ्यामध्ये आढळून येणार्‍या पक्षांच्या 328 पेक्षा जास्त प्रजातींचे वर्णन करण्यात आले आहे. ‘फील्ड गाईड’ म्हणून हे पुस्तक अतिशय उपयुक्त ठरते. ’वाईल्ड ऑर्किड्स ऑफ द नॉर्दन वेस्टर्न घाट्स’ हे उत्तर पश्चिम घाटांमधील जंगली ऑर्किड्सचे पहिले मार्गदर्शनपर पुस्तक आहे. यामध्ये 1400 पेक्षा जास्त रंगीत फोटो आहेत. प्रत्येक प्रदेशातील जंगली ऑर्किड्सच्या 99 प्रजातींचे वर्णन करण्यात आले आहे. ’रेप्टाईल्स ऑफ नॉर्दन वेस्टर्न घाट्स’ या पुस्तकात सरपटणार्‍या प्राण्यांच्या जवळपास 118 प्रजातींची माहिती देण्यात आली आहे. यामध्ये 500 रंगीत फोटो आहेत. विविध प्रजातींच्या संवर्धनाच्या सद्यःस्थितीचीमाहिती यामध्ये देण्यात आली आहे. ’अ‍ॅम्फिबियन्स ऑफ नॉर्दन वेस्टर्न घाट्स’ हे उत्तर पश्चिम घाटांमधील उभयचर प्राण्यांच्या 52 प्रजातींची माहिती देणारे हे पहिले फोटोग्राफिक गाईड आहे. ’ऍक्वा डायव्हर्सिटी ऑफ टाटा पॉवर हायड्रोलेक्स’ या पुस्तकात पाण्याच्या भौतिक व जीवशास्त्रीय गुणवत्तेचे दस्तऐवजीकरण करण्यात आले आहे. त्याबरोबरीनेच रोटीफर्स, ऑस्ट्रेसिज्म आणि फिटोप्लँक्टन इत्यादी विविध प्रजातींची माहिती यामध्ये आहे. वन्यजीवनाबद्दल उत्सुकता असणार्‍यांसाठी, जीवशास्त्रज्ञांसाठी आणि निसर्गप्रेमींसाठी ही पुस्तके अतिशय उपयुक्त आहेत.आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

अक्षय मांडवकर

'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'विशेष प्रतिनिधी' (पर्यावरण/ वन्यजीव) म्हणून कार्यरत. मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. पर्यावरण आणि वन्यजीव क्षेत्राची आवड असल्याने त्यासंबंधीच्या वृत्तांकनामध्ये विशेष रस. महाराष्ट्रातील महत्वाच्या वन्यजीव संवर्धन आणि संशोधन कार्यात सहभाग. भारतीय शास्त्रीय नृत्यशैलीतील 'कथ्थक' नृत्यात विशेष प्राविण्य. देशातील महत्वाच्या शास्त्रीय नृत्य महोत्सव आणि नृत्यविषयक टेलिव्हिजन मालिकांमध्ये सादरीकरण.