गेल्या मंगळवारी भारत आणि मध्य आशिया संयुक्त कार्यकारी समूहाची पहिली बैठक दिल्लीत पार पडली. भारत प्रतिनिधित्व करत असलेल्या या संयुक्त राष्ट्र जागतिक अन्न कार्यक्रम बैठकीत कझाकिस्तान, ताजिकिस्तान, तुर्कमेनिस्तान, उझबेकिस्तान आणि किर्गिज गणराज्य या देशांच्या राजदुतांनी आणि वरिष्ठ अधिकार्यांनी सहभाग घेतला होता. या बैठकीत अफगाणिस्तानच्या सद्यःस्थितीबाबत सखोल चर्चा झाली. अफगाणिस्तानला २० हजार मेट्रिक टन गहू पाठवणार असल्याची मोठी घोषणा भारताने यावेळी केली. विशेष बाब म्हणजे ही मदत पाकिस्तानातून न करता इराणच्या ’चाबहार’ बंदरामार्गे करणार असल्याचे भारताने जाहीर केले. भारताने घेतलेल्या या निर्णयाने पाकिस्तानला चांगलीच पोटदुखी झाल्याचे दिसू लागले आहे.
साधारण ऑगस्ट २०२२ मध्ये अफगाणिस्तानवर तालिबानने कब्जा केला होता. त्यावेळी तिथे निर्माण झालेली परिस्थिती पाहता भारताकडून ५० हजार मेट्रिक टन गहू पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. तालिबान सत्तेवर आल्यानंतर भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील संबंधांबद्दल सर्वांनाच काळजी होती. मात्र, भारताने ५० हजार मेट्रिक टन गहू देण्याचे पहिले आश्वासन पूर्ण केले असल्याने या दोन्ही देशांतील संबंध सुधारले आहेत. जवळपास गेल्या दहा महिन्यांपासून बंद असलेले अफगाणिस्तानातील दूतावासही भारताने पुन्हा सुरू केले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सात वर्षांपूर्वी म्हणजेच २०१६ मध्ये इराण दौरा केला होता. यावेळी पंतप्रधानांनी इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनी आणि राष्ट्राध्यक्ष हसन रुहानी यांची भेट घेतली. भारताच्या साहाय्याने इराण येथे होत असलेले ’चाबहार बंदर’ भारत आणि इराण यांच्यातील चांगल्या संबंधाचे प्रतीक दिसून येते. याच बंदराच्या पहिल्या टप्प्याच्या विकासाकरिता मोदींच्या इराण दौर्यावेळी करार करण्यात आला होता. ’या बंदराच्या पहिल्या टप्प्यात दोन टर्मिनल आणि पाच मल्टीकार्गो बर्थच्या विकासासाठी ‘इंडियन पोर्ट्स ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेड’ आणि ‘आर्य बंदर’ कंपनीसोबत करार झाला असून यावर स्वाक्षरी करणे पंतप्रधान मोदींच्या एक प्रमुख घटना असल्याचे परराष्ट्र मंत्रालयातील संयुक्त सचिव (पाकिस्तान-अफगाणिस्तान-भारत) गोपाल बागले यांनी सांगितले होते.
पंतप्रधानांच्या या इराण दौर्यात प्रामुख्याने कनेक्टिव्हिटी आणि पायाभूत सुविधा, इराणसोबत ऊर्जा भागीदारी, द्विपक्षीय संबंध मजबूत करणे, आपल्या प्रदेशातील शांतता आणि स्थैर्यासाठी नियमित संवाद यावर भर देण्यात आला होता. इराणच्या दक्षिणपूर्व भागात असलेले ‘चाबहार बंदर’ भारतासाठी याकरिता महत्त्वाचे आहे, कारण यामुळे भारताला अफगाणिस्तानात जाण्यासाठी किंवा तिथे व्यवहार करण्यासाठी पाकिस्तानमधून जाण्याची गरज पडणार नाही. भारत अफगाणिस्तानला करत असलेल्या या मदतीची बातमी पाकिस्तानात वार्यासारखी पसरली. त्यामुळे येथील लोकांनी शाहबाज सरकारविरोधात आवाज उठवला आहे. इतकेच नव्हे, तर भारतासाठी धाडसी निर्णय घेणार्या पंतप्रधान मोदींचे पाकिस्तानातील जनतेकडून कौतुक होत आहे. येथील विदेश मंत्रालयातील अधिकार्यांनी तर जाहीरपणे सांगितले की, ’मुंबईसमोर कराची काहीच नाही!’.
इथल्या जनतेचे सरकारकडे म्हणणे आहे की, ’‘भारत अफगाणिस्तानातला मदत करू शकतो, मग पाकिस्तानला का नाही? पाकिस्तानातील सध्याची स्थिती पाहता सरकारी बंगले, सरकारी गाड्या भाडेतत्वावर देण्याची वेळ शेहबाज सरकारवर आली आहे. पाकिस्तानचे भारताशी असणारे वैर येथील लोकांच्या आयुष्यावर बेतत असल्याचे चित्र दिसत आहे. पाकिस्तानातील एका स्थानिक वृत्तवाहिनीच्या सर्वेनुसार, ’पाकिस्तानने भारताशी वैर घेऊन सुडाची भावना घेण्यापेक्षा भारताकडे चांगल्या दृष्टीने पाहावं. भारत करत असलेल्या विकासाकडे पाकिस्तानला पाहण्याची गरज आहे. मात्र, पाकिस्तान जनतेचा विचार करत नसून कायम सूड उगवण्याची भावना घेऊन राहतो,” असे पाकिस्तानातील सामान्य नागरिकांचे म्हणणे आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतासाठी आणि भारतीयांसाठी घेतलेल्या निर्णयांमुळे आज त्यांनी पाकिस्तानातील जनतेच्या मनावरही अधिराज्य गाजवल्याचे दिसते. पाकिस्तानात पंतप्रधान मोदींचा होणारा जयजयकार आणि जनतेच्या तोंडी येणारे कौतुकाद्गार पाहता, ’पाकिस्तान मांगे मोदी सरकार’, असे चित्र याठिकाणी निर्माण झाल्याचे स्पष्टपणे दिसू लागले आहे.